क्रिकेटचा जागतिक प्रसार झाला नाही

बंगळुरू येथे गुरुवारपासून अफगाणिस्तान संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. ही नक्कीच चांगली बाब असली, तरी आयसीसीकडे माझी एक तक्रार आहे की, १४० वर्षांच्या इतिहासामध्ये केवळ १२ देश कसोटी सामने खेळत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:20 AM2018-06-14T05:20:41+5:302018-06-14T05:20:41+5:30

whatsapp join usJoin us
 There is no global spread of cricket | क्रिकेटचा जागतिक प्रसार झाला नाही

क्रिकेटचा जागतिक प्रसार झाला नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

बंगळुरू येथे गुरुवारपासून अफगाणिस्तान संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. ही नक्कीच चांगली बाब असली, तरी आयसीसीकडे माझी एक तक्रार आहे की, १४० वर्षांच्या इतिहासामध्ये केवळ १२ देश कसोटी सामने खेळत आहेत. त्यापैकी अफगाणिस्तान व आयर्लंड या दोन देशांचे पदार्पण याच वर्षी झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी आयर्लंडने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले आणि आता अफगाणिस्तान भारताविरुद्ध पदार्पण करेल. त्यामुळे किती मर्यादित स्वरूपात आयसीसी आपला खेळ चालवत आहे, हे दिसून येते. जर याची तुलना फुटबॉल विश्वचषकाशी केली, तर कळून येईल की या खेळाचा किती प्रचंड प्रसार झाला आहे. जगभरात कुठेही गेलात, तिथे फुटबॉल दिसून येईल. पण कसोटी क्रिकेट त्या तुलनेत दिसून येत नाही. यामागचे कारण म्हणजे मनमोकळेपणे हा खेळ खेळला गेला नाही. केवळ राष्ट्रकुल देशांमध्येच खेळला गेला. अफगाण संघ पहिला राष्ट्रकुल बाहेरील देश ठरला. यावरून कळून येते की ज्या प्रकारे क्रिकेटचा जगभर प्रसार होणे अपेक्षित होते, तसे झाले नाही; व यास जबाबदार आयसीसीच आहे.
आकडेवारीवरून अफगाणिस्तान संघाला विजय मिळविणे खूप कठीण जाईल. विजय तर दूर सामना वाचविणेही त्यांना कठीण असेल. कारण, क्रिकेट इतिहासात १८७७ साली आॅस्टेÑलियाने पहिला कसोटी सामना जिंकला होता, त्यानंतर १९९२मध्ये झिम्बाब्वेने आपला पदार्पणाचा सामना भारताविरुद्ध अनिर्णीत राखला. या दोन सामन्यांचा अपवाद सोडला, तर बाकीच्या सर्व देशांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची कामगिरी कशी होते हे पाहावे लागेल.
भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, तर अफगाणिस्तानच्या खात्यात अजून एकही गुण नाही. भारताला कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती नक्की जाणवेल, पण तरी भारताकडे अनेक कसलेले खेळाडू आहेत. अफगाणिस्तान कर्णधाराने दावा केला आहे की, भारताहून चांगले फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.
अफगाणिस्तानचे राशिद खान, मुजीब रहमान, नाबी हे फिरकी गोलंदाज खूप गुणवान आहेत, यात शंका नाही. पण यांना आपण मर्यादित षटकांमध्ये पाहिले आहे. ४ षटकांच्या तुलनेत एकाच दिवशी १८ षटके गोलंदाजी करण्यासाठी वेगळे कौशल्य लागते आणि हे कौशल्य अफगाणिस्तानच्या गोलंदाजांमध्ये आहे की नाही हे पाहावे लागेल. त्यामुळे या सामन्यात अनुभवाची कमतरता अफगाणिस्तान संघाला भारी पडेल असे मला वाटते.

Web Title:  There is no global spread of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.