टीम इंडियाची विजयी ‘हॅट्ट्रिक’, कोहलीच्या तडाख्यानंतर ‘फिरकी’चा जलवा

‘रनमशिन’ विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद दीडशतकानंतर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकताना दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:48 AM2018-02-08T03:48:48+5:302018-02-08T03:50:34+5:30

whatsapp join usJoin us
Team India's winning hat-trick, after Virat Kohli's tadka | टीम इंडियाची विजयी ‘हॅट्ट्रिक’, कोहलीच्या तडाख्यानंतर ‘फिरकी’चा जलवा

टीम इंडियाची विजयी ‘हॅट्ट्रिक’, कोहलीच्या तडाख्यानंतर ‘फिरकी’चा जलवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केपटाऊन : ‘रनमशिन’ विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद दीडशतकानंतर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकताना दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह विराट सेनेने सहा सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३०३ धावांची आव्हानात्मक मजल मारल्यानंतर यजमानांचा डाव ४० षटकात केवळ १७९ धावांत गुंडाळला. चहल - कुलदीप या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी ४ बळी घेत पुन्हा एकदा यजमानांना आपल्या जाळ्यात अडकवले.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना द. आफ्रिकेचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. दुसºया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने धोकादायक हाशिम आमलाला (१) पायचीत पकडून यजमानांच्या फलंदाजीला सुरुंग लावले. यानंतर कर्णधार एडेन मार्करम (३२) आणि अनुभवी जेपी ड्युमिनी (५१) यांनी ७८ धावांची भागीदारी करुन संघाला सावरले. कुलदीपने १७व्या षटकात मार्करमला बाद करुन ही जोडी फोडली. यानंटर ठराविक अंतराने द. आफ्रिकेचे फलंदाज बाद झाले. यजमानांनी १०० धावांमध्ये ९ फलंदाज गमावल्याने त्यांचा डाव १ बाद ७९ वरुन १७९ धावांत संपुष्टात आला. कुलदीपने टिच्चून मारा करताना २३ धावांत ४, तर युझवेंद्रने ४६ धावांत ४ बळी बाद करुन यजमानांची ‘फिरकी’ घेतली. ड्युमिनीने ६७ चेंडूत ४ चौकारांसह ५१ धावा करत द. आफ्रिकेकडून एकाकी झुंज दिली.
तत्पुर्वी, कागिसो रबाडाने पहिले षटक निर्धाव टाकतानाच हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. यावेळी, दक्षिण आफ्रिका जोरदार पुनरागमन करणार अशीच शक्यता होती.
परंतु शिखर धवन आणि कोहली यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर चौफेर फटकेबाजी करताना दुसºया गड्यासाठी १४० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. धवन मालिकेतील आपले पहिले शतक झळकावणार असे दिसत असतानाच ड्युमिनिला आक्रमक फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. यानंतर पुढच्या ९६ धावांत ४ बळी गेल्याने भारताचा डाव ६ बाद २३६ धावा असा घसरला.
मात्र, जम बसलेल्या कोहलीने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत आफ्रिकन गोलंदाजांना जबरदस्त चोपले. भुवनेश्वर कुमारनेही नाबाद १६ धावांची खेळी करत कोहलीला चांगली साथ दिल्याने भारताला तिनशेचा पल्ला पार करण्यात यश आले. त्याचवेळी अजिंक्य रहाणे (११), हार्दिक पांड्या (१४), महेंद्रसिंग धोनी (१०) आणि केदार जाधव (१) झटपट बाद झाल्याने भारताला अपेक्षित धावसंख्या गाठण्यात अपयश आले.
अष्टपैलू ड्युमिनीने ६० धावांत २ बळी घेत भारताच्या आक्रमकतेला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. तसेच रबाडा, ख्रिस मॉरिस, अँडिले फेहलुकवायो आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
>कोहली-धवन यांची फटकेबाजी
न्यूलँड्सच्या मैदानावर नाणेफेक जिंकून यजमानांनी भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. मात्र, कर्णधार कोहलीच्या दमदार दीडशतकाच्या तडाख्यापुढे त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. कोहलीने १५९ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांसह नाबाद १६० धावांचा तडाखा दिला. त्याचवेळी, सलामीवीर शिखर धवननेही दमदार अर्धशतकी खेळी करताना
६३ चेंडूत १२ चौकारांसह ७६ धावा काढल्या.
>महत्त्वाचे...
कर्णधार म्हणून खेळताना विराट कोहलीने १२वे एकदिवसीय शतक झळकावले.
सर्वाधिक शतके ठोकणाºया कर्णधारांच्या यादीत कोहली आॅस्टेÑलियाचा रिकी पाँटिंग (२२) आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स (१३) यांच्यानंतर तिसºया स्थानी.
यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौºयामध्ये पाचव्यांदा कागिसो रबाडाने रोहित शर्माला बाद केले.
34 तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने ३४ शतक ठोकले
असून सर्वाधिक शतक झ्ळकावणाºयांच्या यादीत त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर (४९) आहे. नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि अनुभवी एबी डिव्हिलियर्स यांच्या अनुपस्थिततेची कमतरता पुन्हा एकदा यजमानांना भासली. या दोघांच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कमजोर बनली.
>महेंद्रसिंग धोनीची विक्रमी कामगिरी
स्टार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात यष्ट्यांमागे ४०० बळी मिळवण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील चौथा यष्टीरक्षक ठरला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याला कुलदीपच्या गोलंदाजीवर यष्टीचीत करुन धोनीने हा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत धोनीआधी ४०० बळी मिळवण्याची कामगिरी कुमार संगाकारा (४८२),
अ‍ॅडम गिलख्रिस्ट (४७२) आणि मार्क बाऊचर (४२४) यांनी केली आहे. 08 पुन्हा एकदा भारतीय फिरकी जोडीने वर्चस्व राखताना द. आफ्रिकेच्या आव्हानातली हवा काढली. चहल - कुलदीप यांनी मिळून ६९ धावांत ८ बळी घेत यजमानांची दाणादाण उडवली.
>धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. क्लासेन गो. रबाडा ०, शिखर धवन झे. मार्करम गो. ड्युमिनी ७६, विराट कोहली नाबाद १६०, अजिंक्य रहाणे झे. फेहलुकवायो गो. ड्युमिनी ११, हार्दिक पांड्या झे. क्लासेन गो. मॉरिस १४, महेंद्रसिंग धोनी झे. एनगिडी गो. ताहिर १०, केदार जाधव झे. क्लासेन गो. फेहलुकवायो १, भुवनेश्वर कुमार नाबाद १६. अवांतर - १५. एकूण : ५० षटकात ६ बाद ३०३ धावा. बाद क्रम : १-०, २-१४०, ३-१६०, ४-१८८, ५-२२८, ६-२३६. गोलंदाजी : कागिसो रबाडा १०-१-५४-१; लुंगी एनगिडी ६-०-४७-०; ख्रिस मॉरिस ९-०-४५-१; अँडिले फेहलुकवायो ६-०-४२-१; इम्रान ताहिर ९-०-५२-१; जेपी ड्युमिनी १०-०-६०-२.
दक्षिण आफ्रिका : हाशिम आमला पायचीत गो. बुमराह १, एडेन मार्करम यष्टीचीत धोनी गो. कुलदीप ३२, जेपी ड्युमिनी पायचीत गो. चहल ५१, हेन्रीच क्लासेन पायचीत गो. चहल ६, डेव्हिड मिल्लर झे. धोनी गो. बुमराह २५, खायेलिहले झोंडो झे. रहाणे गो. चहल १७, ख्रिस मॉरिस पायचीत गो. कुलदीप १४, अँडिले फेहलुकवायो झे. कोहली गो. कुलदीप ३, कागिसो रबाडा नाबाद १२, इम्रान ताहिर झे. कोहली गो. चहल ८, लुंगी एनगिडी पायचीत गो. कुलदीप ६. अवांतर - ४. एकूण : ४० षटकात सर्वबाद १७९ धावा. बाद क्रम : १-१, २-७९, ३-८८, ४-९५, ५-१२९, ६-१५०, ७-१५०, ८-१५८, ९-१६७, १०-१७९. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-४१-०; जसप्रीत बुमराह ७-०-३२-२; हार्दिक पांड्या ८-०-३५-०; युझवेंद्र चहल ९-०-४६-४; कुलदीप यादव ९-१-२३-४.

Web Title: Team India's winning hat-trick, after Virat Kohli's tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.