जागतिक अग्रस्थान भारताच्या दृष्टिक्षेपात

भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गड्यांनी अत्यंत एकतर्फी जिंकत इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व राखले. विशेष म्हणजे इंग्लंड आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी आहे हे विसरता कामा नये.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:20 AM2018-07-14T05:20:40+5:302018-07-14T05:23:46+5:30

whatsapp join usJoin us
Team India will Close to number 1 ranking in ODI | जागतिक अग्रस्थान भारताच्या दृष्टिक्षेपात

जागतिक अग्रस्थान भारताच्या दृष्टिक्षेपात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गड्यांनी अत्यंत एकतर्फी जिंकत इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व राखले. विशेष म्हणजे इंग्लंड आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी आहे हे विसरता कामा नये. त्यामुळेच सर्वांना अपेक्षा होती की हा सामना अत्यंत अटीतटीचा होईल, पण असे झाले नाही. ज्याप्रकारे भारताचा खेळ झाला, ते पाहता इंग्लंडच्या डेÑसिंग रूममध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली असेल.
कारण, भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूंमध्ये जबरदस्त वर्चस्व राखले. गोलंदाजांनी टी२० मालिकेतील वर्चस्व कायम राखले. कुलदीप यादवने सहा बळी घेत पुन्हा एकदा यजमानांना आपल्या तालावर नाचवले. दखल घेण्याची बाब म्हणजे ज्याप्रकारे इंग्लंडची सुरुवात झाली, ते पाहता इंग्लंड तीनशेची मजल मारेल असे वाटत होते. त्यात खेळपट्टीवर खास मदतही मिळत नव्हती. शिवाय सीमारेषाही जवळ असल्याने धावा वेगात निघत होत्या. पहिल्या १० षटकांत इंग्लंडची धावसंख्या १ बाद ७४ धावा अशी होती. मात्र कुलदीपने नंतर संपूर्ण चित्रच पालटले.
येथे मी स्पष्ट करू इच्छितो की, कुलदीप इंग्लंडसाठी का डोकेदुखी ठरत आहे. याचे एकच कारण आहे
की मनगटी फिरकी गोलंदाजी
खेळणे कठीण असते. त्यात फलंदाजांना अशी गोलंदाजी खेळण्याची सवय नसेल, तर मोठी अडचण येणारच. त्यामुळे इंग्लंडने आता अशी गोलंदाजी खेळण्याची मोठी तयारी केली आहे. त्यांच्याकडे एक अत्याधुनिक बॉलिंग मशीन आली आहे, जी मनगटी फिरकी मारा करते आणि त्या जोरावर इंग्लंड आपला खेळ सुधरवू पाहत आहे. पण एक मशीन आणि एक व्यक्ती यात खूप फरक असतो. कारण कुलदीप किंवा कोणताही गोलंदाज विचार करून चेंडू फेकेल, पण मशीन केलेल्या सेटिंगनुसार मारा करेल. त्यामुळेच इंग्लंडची अडचण पूर्णपणे संपलेली नाही.
कुलदीपच्या फिरकीपुढे यजमानांचा डाव २६८ धावांत संपुष्टात आला. ही धावसंख्या २० वर्षांपूर्वी नक्कीच आव्हानात्मक मानली जायची, पण आता ही धावसंख्या माफक आहे. त्यात रोहित शर्मा अशा शानदार फॉर्ममध्ये असताना ही धावसंख्या नक्की पार होणार हे निश्चित आहे. विराट कोहलीनेही शानदार अर्धशतकी खेळी करताना शतकवीर रोहितला चांगली साथ दिली. शिखर धवन टी२० मालिकेत चांगल्या लयीत दिसला नसला, तरी एकदिवसीय सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली. त्याने आपली विकेट फेकली नसती, तर नक्कीच त्याने मोठी खेळी केली असती. एकूणच इंग्लंडचे गोलंदाज भारतीयांवर काहीच वर्चस्व गाजवू शकले नाहीत. या कामगिरीकडे पाहून असे दिसते की भारत ही मालिका ३-० अशी जिंकू शकेल. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आता भारताच्या कब्जात येऊ शकते.
 

Web Title: Team India will Close to number 1 ranking in ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.