मुलांना मैदानावर आणा !

मुंबईत मैदाने शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे खेळणार कुठे, हाच प्रश्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:31 AM2019-01-20T04:31:15+5:302019-01-20T04:31:21+5:30

whatsapp join usJoin us
Take the children to the field ! | मुलांना मैदानावर आणा !

मुलांना मैदानावर आणा !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सिद्धेश लाड
मुंबईत मैदाने शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे खेळणार कुठे, हाच प्रश्न आहे. आम्ही लहानपणी बिल्डिंगमध्ये खेळायचो तेव्हा तेथेही खूप जागा मिळायची, पण आज बिल्डिंगमधली ती जागा वाहनांनी बळकावली. त्यामुळेच मोबाइल, कॉम्प्युटर गेम्सचे मुलांना व्यसन लागले आहे. त्यांना मैदानावर आणायला
हवे.
मी लहानपणापासून मैदानी खेळच खेळत आलो आहे. कारण माझ्या लहानपणी आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. आताच्या मुलांकडे कॉम्प्युटर गेम किंवा मोबाइल गेम असे अनेक पर्याय आहेत. पण माझ्याकडे असे काहीही पर्याय नव्हते, त्यामुळे मी मित्रांसोबत कायम मैदानावर असायचो. शाळेत असताना खो-खो खूप खेळायचो. प्रत्येक पीटी पिरियडमध्ये आम्ही खो-खो किंवा डॉजबॉल खेळायचो. घरी आल्यानंतर बिल्डिंगच्या टीमसोबत बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन खेळायचो, तर पावसाळ्यात फुटबॉलची मजा असायची. अशा अनेक आठवणी मैदानी खेळाविषयी आहेत, जे मी कधीही विसरू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे, माझ्या पालकांनी मला कधीही खेळण्यासाठी रोखले नाही. त्यामुळे मी मैदानी खेळांचा पूर्ण आनंद घेतला आणि आजही तो आनंद घेत आहे.
मी आठवी-नववीमध्ये असताना क्रिकेट व फुटबॉलमध्ये चांगला जम बसवला होता. त्याचवेळी शाळेच्या फुटबॉल प्रशिक्षकांनी मला शाळेच्या फुटबॉल संघातून खेळण्यास सांगितले. पण माझ्या वडिलांनी कोणता तरी एकच खेळ निवडण्यास सांगितले, कारण दोन्ही खेळांमध्ये एकाच वेळी पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मी क्रिकेटला प्राधान्य दिले. माझ्या लहानपणी तंत्रज्ञानाचा फारसा वापर नसल्याचा फायदा झाला. कारण त्यामुळे मी मैदानावर खेळू शकलो. आज मुले कॉम्प्युटर आणि मोबाइल गेममध्ये अडकले आहेत. शिवाय आज मुंबईत पूर्वीप्रमाणे मैदानेही शिल्लक नाहीत. त्यामुळे खेळणार तरी कुठे, हाच मोठा प्रश्न आहे. आम्ही लहानपणी बिल्डिंगमध्ये खेळायचो तेव्हाही खूप जागा मिळायची, पण आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये वाहनांची गर्दी झाल्याने खेळायला जागाच नसते. त्यामुळेच मोबाइल, कॉम्प्युटर गेम्सचे आजच्या मुलांना व्यसन लागल्याचे वाटते.
आज मुलांना मैदानावर आणण्यासाठी पालकांनी आणि शाळांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मैदानी खेळांचे महत्त्व त्यांनी मुलांना सांगितले पाहिजे. शाळेमध्येही शारीरिक शिक्षण मोठ्या प्रमाणात दिले गेले पाहिजे. माझ्या मते मैदानी खेळांचा तास शाळेत सुरुवातीलाच ठेवायला पाहिजे, कारण यामुळे सर्वजण अ‍ॅक्टिव्ह राहतील.
(लेखक मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.)
(शब्दांकन : रोहित नाईक)

Web Title: Take the children to the field !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.