मुंबई: राजकोटच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यात महेंद्रसिंग धोनी त्याच्या लौकिकाला साजेशी मॅचफिनिशरची भूमिका बजावू शकला नाही. त्यावरून धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं आहे. धोनीने आता टी-20 तून निवृत्ती घ्यावी आणि युवा खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणीही अनेक माजी खेळाडूंनी केली आहे.  त्यामुळे जर धोनीची टी-20 संघात वर्णी लागणार नाही तर मग त्याची जागा कोणता खेळाडू घेऊ शकतो हा प्रश्न आहे. कारण क्रिकेट विश्वात धोनीची उणीव भरुन काढणारा खेळाडू मिळणं अशक्य आहे. त्यामुळे धोनीला बदली खेळाडू शोधणं हे भारतीय टीम मॅनेजमेंट पुढे एक मोठं आव्हान असणार आहे हे नक्की. 
ऋषभ पंत –
दिल्लीचा तरूण खेळाडू ऋषभ पंत याने आपल्या प्रदर्शनामुळे सर्वाचंच लक्ष वेधलं आहे. पंतने आतापर्यंत केवळ दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. पण आयपीएलमधील कामगिरीने त्याने सर्वांना प्रभावित केलंय. पंत त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. वयाच्या 20 व्या वर्षीच त्याने क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 
संजू सॅमसन-
युवा खेळाडू संजू सॅमसनने आयपीएलमध्ये खेळातील चुणूक दाखवून दिली आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने शानदार प्रदर्शन केलं. दिग्गज खेळाडू राहुल द्रविडने त्याच्या फलंदाजीचं अनेकदा कौतूक केलं आहे.  सॅमसन आतापर्यंत केवळ एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला असून या सामन्यात त्याने 19 धावा केल्या. 
दिनेश कार्तिक –
दिनेश कार्तिकने वनडे क्रिकेटमध्ये नुकतंच धडाक्यात पुनरागमन केलं आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरपासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी खेळत आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरपासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी खेळत आहे. त्यामुळे धोनीच्या जागी कार्तिकच्या अनुभवाचा चांगला फायदा संघाला होऊ शकतो. 10 टी-20 सामन्यात कार्तिकने 21 च्या सरासरीने आणि 126 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या आहेत.
के.एल. राहुल -
के.एल. राहुलने कसोटी सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडला आहे.  आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी त्याने यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा सलामीवीर फलंदाज केएल राहुल पार्ट टाईम विकेटकीपर म्हणून चांगलं उदाहरण आहे. 
रिद्धीमान साहा –
कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची जागा घेणाऱ्या रिद्धीमान साहाला अजून टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 164 टी-20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 14 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे. साहा उत्तम यष्टीरक्षक आहे, तसंच खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा त्याला चांगला अनुभवही आहे.