कोलकाता : भारताविरुद्ध मागील दौ-यातील खराब कामगिरीतून मोठा बोध घेतला आहे. मात्र आता आमचा संघ पूर्वीच्या तुलनेत सरस असल्याने यजमान संघाविरुद्ध दडपण घेणार नाही, असे श्रीलंका संघाचे मुख्य कोच नीक पोथास यांनी म्हटले आहे.
भारताने लंका दौ-यात यजमान संघाचा तीन कसोटी, पाच वन डे आणि एका टी-२० सामन्यात यजमान संघाला धूळ चारीत सलग नऊ विजयांची नोंद केली होती. द. आफ्रिकेचे असलेले पोथास म्हणाले, ‘तो पराभव न आठवलेला बरा. भारताविरुद्ध भारतात खेळायचे म्हटले तर दडपण जाणवणारच. भारताविरुद्ध पराभवानंतर लंकेने यूएईत पाकला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केले. भारताविरुद्ध काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधारायच्या, यावर मंथन केल्यानंतर पाकविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले होते.’
दोन महिन्यांत काय बदल झाले, असे विचारताच पोथास म्हणाले, ‘संघात शिस्त आणि एकोपा आला आहे. दोन महिन्यांआधी सहयोगी स्टाफ आणि खेळाडू नवीन होते. भारताच्या आधीच्या कामगिरीकडे फारसे लक्ष देऊ नका, असे मी खेळाडूंना बजावले आहे. भारतीय संघाच्या कामगिरीखाली दबून जाण्यापेक्षा त्यांच्या तुलनेत कसे सरस खेळता येईल याचा विचार करा, असेही सांगितले आहे.’

४ गोलंदाजांचा वापर करणार
कोलकाता : यूएईच्या उकाड्यात पाकविरुद्ध
पाच गोलंदाजांचा उपयोग करीत सकारात्मक निकाल देणारा श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने भारताविरुद्ध मात्र चार गोलंदाज वापरण्याचे
संकेत दिले आहेत.
माध्यमांशी बोलताना चांदीमलने पाकविरुद्ध सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज असे समीकरण अवलंबले होते. यूएईच्या गरमीत चार गोलंदाजांसह जिंकणे अवघड होते; पण भारतात खेळपट्टी आणि डावपेच यांचा विचार करून चारच गोलंदाजांचा वापर करणार, असे स्पष्ट केले.

गुरुसिंघाने केला चांदीमलचा बचाव
कोलकाता : गेल्या महिन्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याआधी मी ‘मेयनी’चा (तंत्रमंत्र करणारा) आशीर्वाद घेतला होता, असे वक्तव्य करुन श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने एकच खळबळ माजवली होती. आता भारत दौºयावर आल्यानंतर चांदीमलला याविषयी प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा श्रीलंका संघाचा व्यवस्थापक असांका गुरुसिंघा याने लगेच चांदीमलचा बचाव करताना सारवासारव केली.
संघ व्यवस्थापक आणि माजी फलंदाज गुरुसिंघा याने या प्रश्नाला जास्त महत्त्व न देता स्पष्ट केले की, ‘संघ मैदानावरील कामगिरीला अधिक महत्त्व देत असून आम्ही भारताविरुद्ध १६ नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहोत.’ गुरुसिंघा याने पुढे म्हटले की, ‘चांदीमलने श्रीलंकेत या विषयावरील प्रश्नांचे उत्तरे दिलेली आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानावर प्रदर्शन करावेच लागते.

प्रत्येक खेळाडू असेच करतो. श्रीलंकन संघही मैदानावरील कामगिरीवर अधिक विश्वास ठेवतो.’

भारताने लंका दौºयात सर्व प्रकारांत क्लीन स्वीप केले. त्यानंतर लंकेने यूएईत कसोटी मालिकेत पाकवर विजय नोंदविला खरा; पण वन डे मालिका मात्र पाकला ०-५ ने गमावली. यावर चांदीमल म्हणाला, ‘भारत नंबर वन असून, गेल्या दोन वर्षांत भारताची कामगिरी उंचावली आहे. माझे खेळाडू मात्र भारताचे आव्हान पेलण्यास सज्ज आहेत. भारताला भारतात नमविणे कठीण असल्याची आम्हाला जाणीव आहे; पण याबाबत विचार करण्यापेक्षा पुढचा विचार करणे योग्य राहील. ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. येथील प्रेक्षकांपुढे खेळणे नेहमी आवडते. पाकिस्तानविरुद्ध देखणी कामगिरी करणारे आमचे खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे भारताचे आव्हान परतविण्यास आम्ही सज्ज आहोत.’

रवींद्र जडेजा आणि आश्विन यांच्याविरुद्ध खेळण्याचे डावपेच आखले आहेत. पण याचा खुलासा करणार नसल्याचे चांदीमलने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. जे डावपेच आखले आहेत ते मैदानावरच दिसतील, इतकेच तो म्हणाला.