दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव

हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:13 AM2018-02-22T01:13:22+5:302018-02-22T01:13:46+5:30

whatsapp join usJoin us
South Africa kept the challenge, defeating India by six wickets | दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव

दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून शनिवारी रंगणार अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. 

भारताने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून १८९ धावा काढल्या. अडखळती सुरुवात झाल्यानंतर यजमान पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत आले होते. परंतु, क्ल्सासेन - ड्युमिनी यांनी तिसºया गड्यासाठी ९३ धावांची निर्णायक भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया रचला. क्लासेनने ३० चेंडूत ३ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत सामना यजमानांच्या बाजूने झुकविला. जयदेव उनाडकट याने क्लासेनला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर लगेच धोकादायक डेव्हिड मिल्लरही (५) हार्दिक पांड्याचा शिकार ठरला. यावेळी भारत वर्चस्व राखणार असेच चित्र होते. 

परंतु, एका बाजूने टिकलेल्या ड्युमिनीने फरहान बेहरादीनसह दमदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्का मारला. त्याने उनाडकट टाकत असलेल्या १९व्या षटकात सलग दोन षटकार मारुन संघाला विजयी केले. ड्युमिनीने ४० चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६४ धावांची विजयी खेळी केली. बेहरादीननेही १० चेंडूत नाबाद १६ धावांची उपयक्त खेळी केली. उनाडकटने २, तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

तत्पूर्वी, संघ अडचणीत असताना मोक्याच्यावेळी मनिष पांड्ये (७९*) आणि महेंद्रसिंग धोनी (५२*) यांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १८८ धावांची आव्हानात्मक मजल मारली. ज्यूनिअर डाला याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय फलंदाजीला हादरे दिल्यानंतर मनिष - धोनी यांनी ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. पहिले षटक निर्धाव खेळल्यानंतर दुसºया षटकातील पहिल्याच चेंडूवर डालाने रोहित शर्माला बाद केले. यानंतर शिखर धवन (२४) व अनुभवी सुरेश रैना (३१) यांनी ४४ धावांची भागीदारी करत भारताला सावरले. ड्युमिनीने धवनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात डालाने विराट कोहलीला (१) बाद करुन भारताची अवस्था ३ बाद ४५ अशी केली. 

अँडिले फेहलुकवायोच्या गोलंदाजीवर स्थिरावलेला रैना बाद झाला. रैनाने २४ चेंडूत ५ चौकार लगावले. यावेळी भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा घसरला होता. परंतु, मनिष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. मनिषने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९, तर धोनीने २८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५२ धावांचा तडाखा दिला.

संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकात ४ बाद १८८ धावा. (मनिष पांड्ये नाबाद ७९, महेंद्रसिंग धोनी नाबाद ५२, सुरेश रैना ३१, शिखर धवन २४; ज्यूनिअर डाला २/२८, जेपी ड्युमिनी १/१३, अँडिले फेहलुकवायो १/१५) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १८.४ षटकात ४ बाद १८९ धावा (हेन्रिक क्लासेन ६९, जेपी ड्युमिनी नाबाद ६९; जयदेव उनाडकट २/४२). 

Web Title: South Africa kept the challenge, defeating India by six wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.