दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिलांनीही राखला दबदबा

गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर स्टार फलंदाज मिताली राज आणि स्मृती मानधना या सलामीवीरांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुस-या टी-२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी फडशा पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 09:06 PM2018-02-16T21:06:20+5:302018-02-16T21:07:10+5:30

whatsapp join usJoin us
South Africa defeats South African women as well | दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिलांनीही राखला दबदबा

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिलांनीही राखला दबदबा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ईस्ट लंडन : गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर स्टार फलंदाज मिताली राज आणि स्मृती मानधना या सलामीवीरांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुस-या टी-२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी फडशा पाडला. या दणदणीत विजयासह भारतीय महिलांनी ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याआधी झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारतीय महिलांनी २-१ अशी बाजी मारली आहे.

नाणेफक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत यजमानांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. यावेळी यजमानांना निर्धारित २० षटकात ७ बाद १४२ धावांची समाधानकारक मजल मारण्यात यश आले. यानंतर स्मृतीने तुफानी हल्ला करताना यजमानांच्या गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरण केले. दुस-या टोकाकडून मितालीनेही आक्रमक पवित्रा घेतल्याने द. आफ्रिकेची जबरदस्त धुलाई झाली. या दोघींनी ८६ चेंडूत १०६ धावांची तडाखेबंद शतकी सलामी देत भारताचा विजय अवाक्यात आणला. मोसेलिन डॅनिअल्स हिने १५व्या षटकात स्मृतीला बाद केले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

स्मृतीने ४२ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा फटकावल्या. यानंतर मितालीने कर्णधार हरमनप्रीतसह (७*) भारताच्या विजयावर शिक्का मारला. मितालीने सलग दुस-या सामन्यात अर्धशतक झळकावताना ६१ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ७६ धावांचा विजयी तडाखा दिला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना यजमानांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. सून लूस (३३) आणि नदिने डि क्लेर्क (२६) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अनुजा पाटील आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेत यजमनांना रोखण्यात मोलाचे योगदान दिले.
.....................................
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका महिला : २० षटकात ७ बाद १४२ धावा (सून लूस ३३, नदिने डि क्लेर्क २६; पूनम यादव २/१८, अनुजा पाटील २/३७) पराभूत वि. भारत महिला : १९.१ षटकात १ बाद १४४ धावा (मिताली राज नाबाद ७६, स्मृती मानधना ५७; मोसेलिन डॅनिअल्स १/२१)

Web Title: South Africa defeats South African women as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.