मुंबई, दि. 14 - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सॉफ्ट ड्रिंक कंपनीची कोट्यवधींची ऑफर नाकारली आहे. द हिंदू ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार कोहली स्वतः कोणतंच सॉफ्ट ड्रिंक पित नाही त्यामुळे त्याने सॉफ्ट ड्रिंक कंपनीसोबत करार देण्यास नकार दिला आहे.

मी स्वतः ज्या गोष्टींचा वापर करतो त्याच गोष्टींचा प्रचार करतो असं कोहलीने म्हटलं आहे. कोहलीच्या कठोर ट्रेनिंगमध्ये सॉफ्ट ड्रिंक्ससाठी कोणतीही जागा नाही.  स्वतःला फिट ठेवायला तो तासंतास जिममध्ये घाम गाळत असतो. 

यापूर्वी जूनमध्ये कोहलीने  पेप्सीला जाहीरात करण्यास नकार देवून मोठा झटका दिला होता. कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करत होता. करार संपत आल्यावर पेप्सीने हा करार पुढे वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या गोष्टी मी स्वतः खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसे काय खाण्यास सांगू शकतो’, असे सांगत विराट कोहलीने पेप्सीला मोठा धक्काच दिला होता. विराट पेप्सीची जाहिरात न करण्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाला की, याआधी ज्या गोष्टींचा मी स्वीकार केला होता, ज्यांचा उल्लेख मी आता करू इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वतःला जोडू शकत नाही. साखर आणि कार्बोनेटेड पेयांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम आणि वाढता धोका सध्या चर्चेचा विषय असून यादरम्यानच विराट कोहलीने हा निर्णय घेतला होता. 

2001 मध्ये माजी बॅडमिंटन खेळाडू पुलेला गोपीचंद यांनीही अशाच प्रकारची ऑफर नाकारली होती. 2001 मध्ये ऑल इंग्लंड खिताब जिंकल्यानंतर त्यांना सॉप्ट ड्रिंकची जाहीरात करण्याची ऑफर मिळाली होती. पण स्वतः सॉफ्ट ड्रिंक पित नसल्यामुळे अशा अपायकारक गोष्टींचा प्रचार करणार नाही असं म्हणत त्यांनी जाहीरात करण्यास नकार दिला होता.