Sachin Tendulkar praises under-19 Indian cricket team after winning world cup | U19 World Cup final :'आम्हाला तुमचा अभिमान', सचिन तेंडुलकरकडून विश्वविजेच्या अंडर-19 भारतीय संघाचं कौतुक
U19 World Cup final :'आम्हाला तुमचा अभिमान', सचिन तेंडुलकरकडून विश्वविजेच्या अंडर-19 भारतीय संघाचं कौतुक

मुंबई - भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीमने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. जगभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपला आनंद व्यक्त करत स्तुतीसुमनं उधळली आहेत. सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

'सांघिक कामगिरीसोबत, मोठी स्वप्न पुर्ण होतात. जगज्जेत्या खेळाडूंचं अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. राहुल द्रविड आणि पारस यांनी खेळाडूंना दिलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल त्यांचे विशेष आभार. तरुण खेळाडूंनो तुमचा प्रवास आता सुरु झाला आहे. तुमचं सर्वोत्कृष्ट नेहमी देत राहा. तुम्हाला शुभेच्छा', अशा शब्दांत सचिनने वर्ल्ड कप विजेत्या संघाचं कौतुक केलं आहे. 


डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. कालराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अजिबात दाद न देता चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. देसाईने नाबाद 47 धावा केल्या.

भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले.  नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले. 

खेळाच्या एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मेरलोने सर्वाधिक 76 धावा केल्या.  उप्पलने 34 आणि सलामीवीर एडवर्डसने 28 धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून पोरेल, शिवा सिंह, नागरकोटी, रॉयने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  


Web Title: Sachin Tendulkar praises under-19 Indian cricket team after winning world cup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.