rare coincidences in first and second match between afghanistan vs zimbabwe odi series | क्रिकेटच्या मैदानावरील अगदी दुर्मिळ योगायोग, क्रिकेटफॅन्स म्हणाले हे तर अशक्य !
क्रिकेटच्या मैदानावरील अगदी दुर्मिळ योगायोग, क्रिकेटफॅन्स म्हणाले हे तर अशक्य !

शारजा :  क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, मैदानावर काहीही होऊ शकतं ज्यावर अनेकदा विश्वास ठेवणं कठीण असतं. असंच काहीसं आता झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान पाहायला मिळालं.
 
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला नवखा संघ अफगाणिस्तानने जिंकला. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला 154 धावांनी पराभूत केलं. तर दुस-या सामन्यात झिम्बाब्वेने अफागाणिस्तानवर विजय मिळवला आणि हा विजय देखील 154 धावांनीच मिळवला. तुम्हाला वाटत असेल तर हा योगायोग इथेच संपला नाही.  

पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 333 धावा केल्या होत्या, तर दुस-या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना अगदी तितक्याच म्हणजे 5 गडी गमावून 333 धावा केल्या. पहिल्या सामन्यात अफागाणिस्तानच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 179 धावांवर ऑलआउट झाला, तर दुस-या सामन्यात झिम्बाव्बेच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघही बरोबर 179 धावांवरच ऑलआउट झाला. दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून एक-एक शतक देखील साजरं करण्यात आलं. पहिल्या सामन्यात अफगाणिस्‍तानसाठी रहमत शाह याने 114 धावा केल्या तर दुस-या वनडेत झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने 125 धावांची खेळी केली.  
दोन्ही सामन्यांचा धावफलक एकच राहिला पण फरक एवढाच होता की पहिला सामना अफगाणिस्तानने आणि दुसरा सामना झिम्बाब्वेने जिंकला.  कोणत्याही मालिकेसाठी अशाप्रकारचे योगायोग नक्कीच दुर्मिळ आहेत त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी या मालिकेतील पहिले दोन्ही सामने नेहमी आठवणीत राहतील असेच राहीले आहेत.   

 


Web Title: rare coincidences in first and second match between afghanistan vs zimbabwe odi series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.