पृथ्वीचा 'शॉ' जगाने पाहिला, पण विश्वविजयाचा 'हा' तारा गायबच झाला! (की केला?)

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:25 PM2018-10-05T14:25:11+5:302018-10-05T14:28:37+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw showed his power, but where is under 19 world cup final hero manjot kalra? | पृथ्वीचा 'शॉ' जगाने पाहिला, पण विश्वविजयाचा 'हा' तारा गायबच झाला! (की केला?)

पृथ्वीचा 'शॉ' जगाने पाहिला, पण विश्वविजयाचा 'हा' तारा गायबच झाला! (की केला?)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कारण, क्रिकेटचा सामना कधी, कसा, कुणाच्या बाजूने फिरेल, याचा काहीच नेम नसतो. तोच न्याय बहुधा क्रिकेटवीरांनाही लागू होत असावा. इथे कधी, कोणाचे तारे चमकतील आणि कुणाचे ग्रह फिरतील, हे सांगता येत नाही. मनजोत कालरा हे त्याचं ताजं उदाहरण म्हणता येईल. १९ वर्षांखालील विश्वचषक विजयात धडाकेबाज फलंदाज मनोजतचा सिंहाचा वाटा होता. अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. याउलट, याच आठ महिन्यात जगज्जेत्या 'अंडर-१९' संघाचा कर्णधार पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करून युवा शतकवीर होण्याचा पराक्रमही केलाय. त्यामुळे मनजोत नावाचा तारा उगवण्याआधीच का मावळला, असा प्रश्न निर्माण होतोय.

वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या यंग ब्रिगेडनं दमदार कामगिरी केली होती. पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी, राहुल द्रविडकडून गुरूमंत्र घेत, जगज्जेतेपदाला गवसणी घातली होतीच, पण भविष्यात टीम इंडियामध्ये खेळू शकतील, अशा अनेक वीरांचं दर्शन या स्पर्धेत घडलं होतं. पृथ्वी शॉ हा त्यापैकीच एक. त्याची ताकद, कौशल्य काल जगाने पाहिलंय. त्याशिवाय, शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, हार्विक देसाई हे तरुण-तडफदार शिलेदारही आपापल्या राज्यांचं प्रतिनिधित्व करताहेत. पण, मनजोत कालरा अचानक गायब झालाय आणि संशयाच्या नजरा दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडे वळल्यात.

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात मनजोतनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०१ धावांची खेळी केली होती. त्याबद्दल तो 'मॅन ऑफ द मॅच'ही ठरला होता. पण, राजधानीतील या उगवत्या ताऱ्याच्या पाठीवर थाप मारण्याचं सौजन्यही दिल्ली क्रिकेट संघटनेनं दाखवलं नाही. इतर सगळ्या राज्यांनी वर्ल्ड कप हिरोंना हसत-हसत संघात स्थान दिलं, पण मनजोत त्या शतकी खेळीनंतर अजूनही संधीच्या प्रतीक्षेत आहे. दिल्लीच्या संघात त्याची निवड का नाही, या प्रश्नावर निवड समिती मूग गिळून गप्प आहे.  

खेळाडूंचा 'गेम' करण्याची परंपरा आपल्याकडे नवी नाही. मनजोत त्याचाच बळी ठरण्याची भीती अनेक माजी क्रिकेटपटू आणि जाणकार व्यक्त करतात. एकाही सामन्यात संधी मिळू नये इतका तो खराब खेळाडू आहे का? वर्ल्ड कप जिंकून आला, तेव्हा त्याचा आत्मविश्वास उंचावलेला होता. तेव्हाच त्याला संधी द्यायला हवी होती. पण मनजोतच्या भविष्याशी खेळ खेळला जातोय, असा आरोपच माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्ना यांनी केला. 

दिल्लीतील हिरे शोधून काढण्यासाठी डीडीसीएनं एक समिती स्थापन केली होती. त्यात वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आकाश चोप्रा हे वीर होते. हे त्रिकूटही  मनजोतमधील गुण हेरू शकले नाही का?, असा प्रश्नही उपस्थित होतोय. 

Web Title: Prithvi Shaw showed his power, but where is under 19 world cup final hero manjot kalra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.