गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमीच

ब्रिस्टॉल येथील अखेरचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. अखेरचा सामना एकतर्फी झाला, पण या सामन्यात भारतावर अधिक दबाव होता. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकल्याने तिसरा सामना निर्णायक होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:59 AM2018-07-10T00:59:57+5:302018-07-10T01:00:37+5:30

whatsapp join usJoin us
the praise for the bowlers | गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमीच

गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमीच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन

ब्रिस्टॉल येथील अखेरचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. अखेरचा सामना एकतर्फी झाला, पण या सामन्यात भारतावर अधिक दबाव होता. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकल्याने तिसरा सामना निर्णायक होता. या वेळी पहिल्या १०-१२ षटकांचा खेळ पाहिल्यानंतर वाटले की, हा सामनाही इंग्लंडच जिंकणार. कारण त्यांनी खूपच आक्रमक फलंदाजी केली होती.
असे वाटले की, लहान मैदानाचा फायदा घेत, इंग्लंड २२०-२२५च्या आसपास धावसंख्या उभारेल, पण जोस बटलर आणि जेसन रॉय यांना बाद करून भारताने जबरदस्त पुनरागमन केले आणि इंग्लंडला २००च्या आत रोखले. इंग्लंडने तरी १९८ धावांची आव्हानात्मक मजल मारली, पण माझ्या मते त्या मैदानावर विजयासाठी आणखी २०-२५ धावांची आवश्यकता होती. त्यामुळेच भारतीय गोलंदाजांचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे. जरी नंतर फलंदाजांनी सामना जिंकविला असला, तरी सामन्याचे खरे विजेते हे गोलंदाजच आहेत.
जेव्हा खेळपट्टी सपाट असेल, हवामान अनुकूल नसेल आणि चेंडू स्विंग होत नसेल, त्यात मैदान लहान, अशा कठीण परिस्थितीमध्ये जबाबदारी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांवर अधिक असते. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांकडून योग्य मारा न झाल्यास सामना हाताबाहेर जाऊ शकतो आणि असेच काहीस सुरुवातीला भारतासोबत घडले, पण नंतर ज्याप्रकारे गोलंदाजांनी अप्रतिम पुनरागमन करत सामना खेचून आणला, त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्या तुलनेत फलंदाजांना खूप मोठी संधी होती.
रोहित शर्माने शानदार शतक ठोकले, विराट कोहलीने चांगली फटकेबाजी केली, पण सामना जिंकण्यात गोलंदाजांचे योगदान जास्त होते. भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव दोघेही खेळत नव्हते, हे विसरता कामा नये. माझ्या मते तांत्रिकदृष्ट्या हा खूप चांगला निर्णय होता. कुलदीपला फार संधी देण्याची गरज नाही. कारण तो एकदिवसीय आणि कदाचित कसोटी सामन्यातही भारताचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो, पण ज्याप्रकारे हार्दिक पांड्या, उमेश यादव, युझवेंद्र चहल यांनी मारा केला, ते शानदार होते.
रोहित शर्माने निर्णायक सामन्यात शतक ठोकत सामनावीर पुरस्कार पटकावला. हे त्याचे टी-२० सामन्यातील तिसरे शतक होते आणि हे खूप मोठे यश आहे. अनेक जण त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर टीका करतात, पण माझ्या मते त्याच्या गुणवत्तेवर कोणतीही शंका नसावी.
रोहित शर्मा खूप जबरदस्त फलंदाज आहे आणि खास करून कर्णधार व प्रशिक्षकांचा त्याच्या क्षमतेवर खूप विश्वासही आहे. एक गोष्ट नक्की की, अजून त्याने कसोटी संघात आपली जागा निश्चित केलेली नाही. सामनावीर भलेही रोहित ठरला असेल, पण माझ्या मते सामनावीर संयुक्तपणे मिळायला हवा होता. कारण हार्दिक पांड्याचे योगदानही खूप जबरदस्त होते. ४ षटकांत ३८ धावा देत ४ बळी घेतले आणि त्यानंतर त्याने ज्याप्रकारे बिनधास्त फलंदाजी केली, ते अप्रतिम होते. त्यामुळेच तो या दौऱ्यात भारतासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो.

Web Title: the praise for the bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.