अव्वल कोहलीची नंबर वन टीम इंडिया, कसोटीपाठोपाठ वनडेतही दबदबा   

कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्याचा खेळ पाहता तेथील अव्वस्थानावही भारतीय क्रिकेटचा झेंडा फडकण्यास वेळ लागणार नाही.

By Balkrishna.parab | Published: October 4, 2017 10:50 PM2017-10-04T22:50:06+5:302017-10-04T22:56:07+5:30

whatsapp join usJoin us
Number one team in top-ranked Kohli, India's one-day internationals | अव्वल कोहलीची नंबर वन टीम इंडिया, कसोटीपाठोपाठ वनडेतही दबदबा   

अव्वल कोहलीची नंबर वन टीम इंडिया, कसोटीपाठोपाठ वनडेतही दबदबा   

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या पाय ठेवू तिथे विजय मिळवू अशा फॉर्ममध्ये आहेत. नुकत्याच आटोपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्याचाच प्रत्यय आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मालिकेत दणदणीत विजय मिळवला. विराटसेनेने नुसता विजयच मिळवला नाही तर एखाद्या दुबळ्या संघाला चिरडावे तशा थाटात ऑस्ट्रेलियाचा 4-1 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला.  
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती, पण अपवाद वगळता संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचाच दबदबा दिसून आला. एकेकाळी प्रतिस्पर्धी संघावर दबाव ठेवणारा ऑस्ट्रेलियन संघ यावेळी पूर्णपणे दबावात दिसून आला. प्रतिस्पर्ध्याला दुय्यम लेखणे, आपल्याच मस्तीत वावरणे, जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीला जाणे ह्या त्यांच्या पारंपरिक गुणातील काहीही त्यांच्या खेळात दिसून आले नाही.  चेन्नईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुरुवातीला त्यांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनीने केलेल्या धुलाईने त्यांच्या आव्हानातील हवा निघाली. नंतर संपूर्ण मालिकेत त्यांना त्यांच्यात आक्रमकता दिसून आली नाही. उलट विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पद्धतशीरपणे आक्रमक आणि बचावात्मक वृत्तीचा मिलाफ साधला. 
 भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळत असल्याचा या मालिकेत सर्वाधिक फायदा झाला. मात्र त्याबरोबरच दोन्ही संघांमधील सर्वात मोठा फरक होता तो दोन्ही संघांचा आत्मविश्वास. पहिल्या लढतीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे खांदे पडले, उलट पहिल्या तीन सामन्यान अडचणीत आल्यावरही भारतीय संघाने पाहुण्यांसमोर गुडघे टेकले नाही. उलट त्यांच्यावर पलटवार करत सामन्याचा निकाल पालटवण्याची किमया साधली. पहिल्या सामन्यातील हार्दिक पांड्याची फलंदाजी, दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवने घेतलेली हॅटट्रिक त्याचाच परिणाम होता. आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव असल्याने वॉर्नर, फिंच, स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे भारताविरुद्ध चांगली फलंदाजी करतील, अशी अपेक्षा होती. पण वॉर्नर आणि फिंचचा अपवाद वगळता इतर ऑस्ट्रेलियाई फलंदाजांना या माकिलेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पॅट कमिन्स, नाथन कोल्टिएर नील आणि केन रिचर्डसन या पाहुण्या गोलंदाजांनी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत चांगली गोलंदाजी केली. पण भारतीय फलंदाजीला वेसण घालणे काही त्यांना शक्य झाले नाही.
विराट कोहली आणि भारतीय संघासाठी मात्र ही मालिका सर्वार्थाने सकारात्मक ठरली. कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान राखले. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. तर गोलंदाजीत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या तोडीस तोड कामगिरी केली. घरचे मैदान असले तरी ऑस्ट्रेलियासारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असल्याने या मालिकेत मोठ्या फरकाने मिळवलेला विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरलाय. त्यातच कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्याचा खेळ पाहता तेथील अव्वस्थानावही भारतीय क्रिकेटचा झेंडा फडकण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे ती फक्त कामगिरीत याचप्रकारचे सातत्य राखण्याची. 

Web Title: Number one team in top-ranked Kohli, India's one-day internationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.