mumbai indians News | मुंबईसाठी पंड्याबंधू व पोलार्डला सूर गवसणे आवश्यक
मुंबईसाठी पंड्याबंधू व पोलार्डला सूर गवसणे आवश्यक

- हर्षा भोगले
सुरुवातीला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुनरागमन करणे हा इतिहास असला तरी मुंबई इंडियन्स या सुरुवातीमुळे मात्र नक्कीच नाराज असेल. आयपीएल प्रदीर्घ कालावधीची स्पर्धा असून यात पुनरागमन करण्याची शक्यता असते, हे खरे आहे. पण, तुम्ही शक्य तितक्या लवकर संघाचे योग्य संयोजन आणि प्रमुख खेळाडूंना सूर गवसणे आवश्यक असते. याबाबत मुंबई इंडियन्स मात्र संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. संघाला केवळ योग्य संयोजनाबाबतच अडचण भासत आहे असे नसून अनेक खेळाडू सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विशेष पर्यायही नाही.
कागदावर बघता त्यांचा संघ समतोल भासत आहे. दोन गोलंदाज व एक यष्टिरक्षक अव्वल सातमध्ये आहेत. मी सुरुवातीला आयपीएलचा अभ्यास केला होता. त्यात नंबर ५, ६, ७ मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे आहेत. पंड्याबंधूंकडे वेगवेगळे कौशल्य आहे. दोघेही चेंडू व बॅटने योगदान देऊ शकतात आणि पोलार्डच्या फलंदाजीविना कुठलीच लढत पूर्ण होऊ शकत नाही, पण येथेच संघाला समस्या भेडसावत आहे. कृणाल दुखापतग्रस्त होता व तो स्थानिक मोसमात खेळू शकला नाही व हार्दिक दुखापतीबाबत संघर्ष करीत असावा, अशी मला शंका आहे. त्यामुळे दोघेही आपली भूमिका बजावण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आठ षटके आणि दोन फलंदाज प्रभावित झाले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या आगामी कालावधीमध्ये हे दोन्ही खेळाडू छाप सोडण्यात यशस्वी ठरतील, अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे पोलार्डही योगदान देईल. दरम्यान, पुनरागमन करण्यास अधिक वेळ लागायला नको, यावर त्यांना लक्ष द्यावे लागेल. मुंबई इंडियन्ससाठी पॅट कमिन्स उपलब्ध नसणे आणि लसिथ मलिंगाच्या फॉर्मची घसरण चिंतेचा विषय आहे. मलिंगा आयपीएलच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. तसे मुस्तफिजूर रहमान प्रयत्न करीत आहे, पण वेगवान गोलंदाजांना कुठला पर्याय नसतो. सनरायझर्ससाठी बिली स्टॅनलेक तशी भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या १० वर्षांमध्ये जेतेपद पटकावण्यासाठी सर्वोत्तम संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात यशस्वी ठरेल व पुनरागमन करेल, अशी आशा आहे, पण त्यासाठी त्यांना चौथी लढत कुठल्याही स्थितीत जिंकावीच लागेल. (टीसीएम)


Web Title: mumbai indians News
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.