पल्लेकल, दि. 13 - केवळ तिसरा कसोटी सामना खेळणा-या हार्दिक पांड्याने पल्लेकल कसोटीत एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावावर केला आहे.  तुफानी फटकेबाजी करत या सामन्यात हार्दिकने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक फटकावलं. हार्दिक पांड्याने  96 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह फटकावलेल्या 108 धावांमुळे भारताने पहिल्या डावात 487 धावा ठोकल्या. 
या धमाकेदार खेळीमध्ये पांड्याने एका षटकात तब्बल 26 धावा कुटल्या. यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. श्रीलंकेचा लेफ्ट आर्म स्पिनर मिलिंदा पुष्पकुमाराच्या ओव्हरमध्ये त्याने सलग तीन षटकार आणि दोन चौकार  (4, 4, 6, 6, 6, 0)  फटकावले.  या खेळीमुळे पांड्याने महान खेळाडू कपिल देवचा विक्रम मोडला. कपिलने 1990 मध्ये एकाच ओव्हरमध्ये 24 धावा ठोकल्या होत्या.  इंग्लंडचा स्पिनर  एडी हेमिंग्स याच्या षटकात कपिलने लागोपाठ चार षटकार (0, 0, 6, 6, 6, 6) लगावले होते. 
भारतीय संघाने आज खेळायला सुरुवात केल्यावर वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्याने संयमी सुरुवात केली. मात्र सावध खेळत असलेला साहा 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पांड्याने कुलदीप यादवसोबत (26)  61 धावांची भागीदारी करत संघाला चारशेपार मजल मारून दिली. कुलदीप बाद झाल्यावर पांड्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. यादरम्यान, त्याने मालिंदा पुष्पकुमाराच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावा वसूल केल्या. पांड्याने त्यानंतरही लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवत अवघ्या 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.   कालच्या 6 बाद 329 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने आज उपाहारापर्यंतच्या खेळात आपल्या धावसंख्येत 158 धावांची भर घातली.  उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 9 बाद 487 धावा झाल्या होत्या. मात्र उपाहारानंतर भारताचा डाव लांबला नाही. पांड्याला 108 धावांवर बाद करत लक्षण सँडकनने भारताचा डाव 487 धावांवर संपु्ष्टात आणला. सँडकनने पाच बळी टिपले. 
तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी  सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे सहावे कसोटी शतक आणि त्याने लोकेश राहुलसोबत सलामीला केलेल्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे यजमान श्रीलंकेने भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३२९ धावांत रोखले.