मिस यू युवी... निवृत्तीनंतर एक खास पत्र

क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देणाऱ्या युवराज सिंगला एक अनावृत पत्र

By प्रसाद लाड | Published: June 10, 2019 05:59 PM2019-06-10T17:59:32+5:302019-06-10T18:00:29+5:30

whatsapp join usJoin us
Miss You yuvi ... A special letter after retirement | मिस यू युवी... निवृत्तीनंतर एक खास पत्र

मिस यू युवी... निवृत्तीनंतर एक खास पत्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्रिय युवी....
लढवय्या, या फक्त एकाच शब्दात तुझं वर्णन करता येणार नाही. तू जिगरबाज होतास, दिलदारही. एक प्रोफेशनल खेळाडू ते भावुक व्यक्ती एवढा मोठा तुझ्या आयुष्याचा कॅनव्हास.  तू फक्त खेळाडू म्हणून नाही तर माणूस म्हणूनही ग्रेट होतास. सध्या खेळाडू फक्त प्रोफेशनल झाले आहेत. त्यांना भावना नाहीत. तुझ्यापेक्षा कदाचित त्यांच्यामध्ये गुणवत्ता जास्त असेलही, पण युवराज तुझ्यासारखा दुसरा कुणी होणे नाही. पण तुझ्या कारकिर्दीचा हा शेवट पाहून मन विषण्ण होतं. कारण तुझ्यासारखा खेळाडू मैदानातच निवृत्त व्हायला हवा. ही तुझी इच्छाही होती. पण तू कुणापुढे झुकणार नाहीस, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळेच तुला एका पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर करावा लागला. असो.

खरंतर तुझ्या निवृत्तीने आश्चर्याचा धक्का बसला नाही. कारण ते काही दिवसांत अपेक्षितच होतं. तुला जेव्हा भारतीय संघापासून दूर ठेवण्यात येत होतं, तेव्हा पासूनच तुझ्या कारकिर्दीच्या शेवटाच्या सुरुवातीला सुरुवात झाली होती. त्यामुळे हा धक्का नव्हता. पण यापुढे तू आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसणार नाहीस, याची सल मनात नक्कीच असेल. कारण तू फक्त चांगला खेळाडू नव्हतास, तर बऱ्याच जणांच्या ह्दयावर तू अधिराज्य गाजवलंस.

खरंतर तुझी कारकिर्द अजूनही डोळ्यापुढे लख्ख झळाळते आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तुझी 84 धावांची खेळी ही ठिणगी होती. त्यानंतर तुझ्या फटकेबाजीच्या झळा गोलंदजांना कायम बसत होत्या. नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम फेरीतही तुझी बॅट तळपली. त्यानंतर किती गोष्टी सांगायच्या तुझ्याबद्दल. प्रत्येक सामन्यागणिक तुझे चाहते वाढतंच होते. जाँटी ऱ्होड्सनंतर पॉइंटवर उभा राहणारा चपळ क्षेत्ररक्षक कोण, तर आपसूकच तुझं नावं चाहत्यांच्या मुखी येईल.

तुझ्यामध्ये काय नव्हतं? स्फोटक फलंदाज तर तू होतास, चपळ क्षेत्ररक्षण तू करायचास, त्याचबरोबर भागीदारी फोडणारी गोलंदाजी हेदेखील तुझं अस्त्र होतं. पण एकदा का कुणी डोक्यात गेला तर त्याला पायदळी आणण्याचं काम तू चोख करायचास. ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सहा षटकार हे त्याचंच एक द्योतक म्हणावं लागेल. फ्लिंटॉफबरोबर तुझं वाजलं. तू बॅट घेऊन त्याच्या दिशेने धावतही गेलास. पण त्यानंतर भानावर आलास. आणि हा सारा राग त्या मिसरूडही न फुटलेल्या स्टुअर्ट ब्रॉडवर काढलास. विश्वचषकात गोलंदाजाची अशी पिसं कुणी भारतीय फलंदाजांनी काढल्याचे स्मरणात तरी नाही. खेळाडूंना एक विश्वचषक उंचावता येत नाही. पण तु तर तीन विश्वचषक उंचावलेस. 

2011 सालच्या विश्वविजयात तुझा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी तू युवराज सिंग नाही तर युवराज सिंह वाटलास. दिलेली प्रत्येक जबाबदारी तू अप्रतिमपणे पेललीस. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू तू ठरलास. जीवाची पर्वा केली नाहीस. विश्वचषकाच्या दरम्यान कदाचित तुला ती वाईट बातमी समजली होती, असं काही जणं म्हणतात. पण तू सीमेवरील जवानासारखा देशासाठी क्रिकेटच्या मैदानात लढलास. आणि विश्वचषकाची लढाई भारताला जिंकवून दिलीस. विश्वचषकाची लढाई संपल्यावर तू कॅन्सरशी लढायला सज्ज झालास आणि हे मैदानही तू मारलंस.

कॅन्सरला झुंजवून तू मैदानात येशील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तुझ्यासारखा जिद्दी तुचं. एवढा फिटनेस तू कमावलास की, मैदानात तुझ्यातील कमतरता जाणवत नव्हती. पण कालांतराने तुझ्यातला तो युवराज मात्र लुप्त होताना दिसत होता. 2014 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तू थोडासा संथ खेळला होतास. 21 चेंडूंत 11 धावा तू केल्या होत्या. त्यावेळी भारताला 130 धावांवर समाधान मानावे लागले होते. भारत हा सामना हरला. त्यानंतर काही जणांनी तुझ्यावर पराभवाचं खापर फोडायला सुरुवात केली होती. त्यावेळी चाहत्यांनी तु जिंकवून दिलेल्या सामन्यांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर मात्र तुझ्यावर टीका करायला कुणी धजावलं नाही.

आयुष्यात तू बऱ्याच गोष्टी केल्यास. लढवय्या बाणा दाखवला. जिगरबाज, दिलदारपणा दाखवला. पण एक गोष्ट तुला जमली नाही. ती म्हणजे, राजकारण. ही गोष्ट जर तुला जमली असती तर धोनीपूर्वीच भारताचा कर्णधार झाला असतास. तुझ्यामध्ये नेतृत्वगुण नव्हते, असं नाही. पण तू त्यासाठी राजकारण खेळला नाहीस. कारण खेळाडूंना संघाबाहेर काढणं, आपला गट तयार करणं, हे धोनीसारखं तुला जमणार नव्हतं. धोनी आणि तुझ्या मैत्रीची उदाहरणं, जगजाहीर होतं. पण ही मैत्री धोनी कर्णधार झाल्यानंतर विरुन गेली. जिथे धोनीने आपल्या लग्नाची बातमी जगजाहीर केली, पण तुला मात्र कळवली नव्हती. तेव्हा तुमची मैत्री किती घट्ट आहे, हे सामान्य माणसालाही कळलं.

खरंतर तुझ्यावर बऱ्याच गोष्टी लादल्या गेल्या. वडिलांनी तर तुझ्याकडून क्रिकेट घोटवून घेतलं, इच्छा नसतानाही. पण तुझं काही वाईट झालं नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये विरघळून जाण्याचा तुझा स्वभावंच आहे. घरी आई-बाबांमध्ये सख्य नव्हतं. त्या वाद-विवादांमध्येही तू स्वत:ला कोमेजू दिलं नाहीस. तू नेहमीच टवटवीत राहीलास. त्यामुळेच बॉलीवूडच्या ललना तुझ्यावर भाळलेल्या असायच्या. प्रणयाच्या खेळपट्टीवरही तुझी चांगलीच बॅटींग गाजली. बऱ्याच बॉलीवूडच्या ललनांबरोबर तुझी नावं जोडली गेली. पण त्यामध्ये हिडीसपणा दिसला नाही.

असो. आता तू आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसणार नाहीस. आयपीएल खेळशील की नाही, माहित नाही. पण तुझ्यासारख्या गुणी क्रिकेटपटूने क्रिकेटची अविरत सेवा करावी, असंच तुझ्या चाहत्यांना वाटत आहे. तु पडद्याआड जाशीलंही. पण तुझी आठवण कायम मनात घरं करून राहिल. ती पुसणं या जन्मी तरी शक्य नाही. कारण आतापर्यंत अनेक अवीट आनंदाचे क्षण तू आम्हाला दिले आहेत. या क्षणांसाठी आम्ही कायम तुझे ऋणी राहू.


तुझाच एक चाहता

Web Title: Miss You yuvi ... A special letter after retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.