महेंद्रसिंग धोनीवर सातत्याने टीका व्हायला पाहिजे - रवी शास्त्री

महेंद्रसिंग धोनी खूप अनुभवी आहे. त्याच्यासारखे खेळाडू खूप कमी मिळतात. पण जेव्हा लोक म्हणतात की, धोनी संपलाय! तेव्हा मला खूप मजा येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:55 AM2019-05-15T01:55:09+5:302019-05-15T01:55:20+5:30

whatsapp join usJoin us
 Mahendra Singh Dhoni should be constantly criticized - Ravi Shastri | महेंद्रसिंग धोनीवर सातत्याने टीका व्हायला पाहिजे - रवी शास्त्री

महेंद्रसिंग धोनीवर सातत्याने टीका व्हायला पाहिजे - रवी शास्त्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)

मुंबई : महेंद्रसिंग धोनी खूप अनुभवी आहे. त्याच्यासारखे खेळाडू खूप कमी मिळतात. पण जेव्हा लोक म्हणतात की, धोनी संपलाय! तेव्हा मला खूप मजा येते. कारण यानंतर धोनीकडून त्यांची बोलती बंद होते. यासाठीच लोकांनी सातत्याने धोनीवर टीका करावी,’ असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी शास्त्री यांच्याशी विशेष बातचीत केली. या वेळी शास्त्री यांनी धोनीविषयी विशेष मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मी दरवेळी सांगत असतो की, ३०-४० वर्षांमध्ये धोनीसारखे खेळाडू मिळणार नाहीत. जेव्हा तो निवृत्त होईल, तेव्हा लोकांना कळेल की धोनी किती मोठा खेळाडू होता. त्याने एक खेळाडू, विविध भूमिका निभावताना सर्व यश मिळविले आहे. त्याने जे जिंकायचे होते, ते सर्व जिंकले आहे. तरीही संघाप्रति त्याची समर्पणाची भावना कौतुकास्पद आहे.’
कर्णधार विराट कोहलीच्या प्रगतीबाबत शास्त्री म्हणाले की, ‘कोहलीने आपल्या कारकिर्दीमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांतील भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यास हे सर्व लक्षातही येईल. त्यामुळे मला कोहलीविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याच्यात आणखी ७-८ वर्षे खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो अजून कर्णधारपद सांभाळू शकतो आणि त्यानुसार आणखी प्रगतीही करू शकतो.’
अष्टपैलू केदार जाधवला आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीची भारताला चिंता आहे. शास्त्री म्हणाले की, ‘केदारला कोणतेही फ्रॅक्चर नाही. त्यामुळे त्याला सावरण्यास खूप वेळ मिळेल. शिवाय २२ मेपर्यंत संघात बदल करता येऊ शकतो. त्यानंतरही स्पर्धा सुरू होण्यास दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे याविषयी निर्णय घेण्यास अद्याप खूप वेळ आहे.’
हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर विशेष लक्ष असेल. एका टीव्ही शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बंदीला सामोरे गेल्यानंतर दोघांचे पुनरागमन होईल. याविषयी शास्त्री म्हणाले की, ‘त्यांच्या पुनरागमनाविषयी मी काहीच बातचीत केली नाही. खेळाडू युवा असतात, तेव्हा त्यांच्याकडून कधीकधी चुका होतात आणि यातून त्यांनी शिकले पाहिजे. माझ्या मते या प्रकरणानंतर दोघेही कणखर झाले असून दोघांना जाणीवही झाली आहे. शिवाय मानसिकरीत्या दोघेही आता मजबूत झाले आहेत.’

भारतासाठी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात नक्कीच आव्हानात्मक आहे, पण आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करणार आहोत. कारण स्पर्धेतील सर्वच संघ धोकादायक आहेत. कोणत्याही संघाला गृहीत धरले तर ती मोठी चूक ठरेल. त्यामुळे प्रत्येक सामना गांभीर्याने खेळला गेला पाहिजे. जर सुरुवातीलाच विजयी लय मिळाली, तर त्याचा खूप चांगला फायदा होईल.
- रवी शास्त्री, प्रशिक्षक - भारत

Web Title:  Mahendra Singh Dhoni should be constantly criticized - Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.