मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींमुळे भारतीय क्रिकेट ढवळून निघत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही या समितीबाबत परखड मत व्यक्त केले आहे. ‘लोढा समितीने दिलेल्या अहवालाने क्रिकेटचे नक्कीच नुकसान झाले आहे,’ असे स्पष्ट आणि कठोर मत पवार यांनी व्यक्त केले आहे.
माजी न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील लोढा समितीने बीसीसीआयमध्ये पारदर्शी व्यवहार राहावा यासाठी सुचविलेल्या शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. यामुळे बीसीसीआय आणि संलग्न संघटनांना या शिफारशींनुसार कार्य करणे अनिवार्य बनले आहे. या शिफारशींबाबत जेव्हा पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘नक्कीच लोढा शिफारशींनी क्रिकेटचे नुकसान झाले आहे.’ पवार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद भूषवितानाही आपली छाप पाडली आहे.