‘घरचे शेर’ विदेशात ‘ढेर’, भारत १३५ धावांनी पराभूत, मालिका विजयाची मोहीम थांबली

द. आफ्रिकेच्या वेगवान मा-यापुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घालताच बुधवारी दुस-या कसोटीत तब्बल १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:02 AM2018-01-18T04:02:32+5:302018-01-18T04:02:55+5:30

whatsapp join usJoin us
'Lion of the World' 'Pile' abroad, India lost by 135 runs, series victory over series | ‘घरचे शेर’ विदेशात ‘ढेर’, भारत १३५ धावांनी पराभूत, मालिका विजयाची मोहीम थांबली

‘घरचे शेर’ विदेशात ‘ढेर’, भारत १३५ धावांनी पराभूत, मालिका विजयाची मोहीम थांबली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : द. आफ्रिकेच्या वेगवान मा-यापुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घालताच बुधवारी दुस-या कसोटीत तब्बल १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिला सामना ७२ धावांनी गमावणारा भारतीय संघ मालिकेत ०-२ असा माघारताच, ओळीने सलग नऊ मालिका विजयाच्या मोहिमेला खीळ बसली. पूर्णवेळ कर्णधार या नात्याने कोहलीने पहिली मालिका गमावली आहे.

यजमान संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने दुस-या डावात भारताच्या सहा फलंदाजांना १२.२ षटकांत ३९ धावांत माघारी धाडत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. २८७ धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ पाचव्या दिवशी ५०.२ षटकांत १५१ धावांत गारद झाला. रोहित शर्माने सर्वाधिक ४७ धावा केल्या. फाफ डु प्लेसिसच्या संघाने या विजयासह २०१५ च्या ०-३ ने झालेल्या पराभवाचा वचपा काढला. लुंगी सामनावीर ठरला.

भारताच्या खेळातील अनेक उणिवा चव्हाट्यावर आल्या. संघनिवडीत उणिवा होत्या, शिवाय विजयाची भूक दिसत नव्हती. धावा काढताना फलंदाजांमध्येही समन्वयाचा अभाव जाणवत होता. भारताने दिवसाची सुरुवात ३ बाद ३५ वरून केली. लवकरच ७ बाद ८७ अशी अवस्था झाली. पुजारा (१९) धावबाद झाला. पार्थिव पटेल (१९), हार्दिक पंड्या (६), रविचंद्रन आश्विन (३) हे बाद होताच विजयाची आशा संपुष्टात आली. रोहित आणि शमी यांनी आठव्या गड्यासाठी ६१ चेंडूंत ५४ धावा करीत ३९ व्या षटकांत भारताच्या १०० धावा फळ्यावर लावल्या. रबाडाने रोहितला झेलबाद करीत ही जोडी फोडली. शमी आणि बुमराह हे एनगिडीचे बळी ठरले. ईशांत शर्मा चार धावांवर नाबाद राहिला. मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे २४ जानेवारीपासून खेळला जाईल.

जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीला पायचीत करणे तो क्षण माझ्यासाठी विशेष होता. त्याला गोलंदाजी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि एक विशेष रणनीती तयार केली होती. शेवटी मी कोहलीला बाद करण्यात यशस्वी झालो. -लुंगी एनगिडी

एनगिडीचा पदार्पणात विक्रम
लुंगी एनगिडीने आज पदार्पणात सहा गडी बाद केले. त्यासोबतच लान्स क्लुझनर (भारताविरुद्ध १९९६ मध्ये ६२ धावांत ८ बळी), चार्ल्स लँगवेल्ट (इंग्लंडविरुद्ध २००५ मध्ये ४६ धावांत ५ बळी), व्हर्नोन फिलॅन्डर (आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०११ मध्ये १५ धावांत ५ बळी), मर्चेन्ट डि लेंगे (श्रीलंकेविरुद्ध २०११ मध्ये ८१ धावांत ७ बळी) आणि केली एबोट (पाकिस्तानविरुद्ध २०१३ मध्ये २९ धावांत ७ बळी) यांच्यानंतर देशासाठी पदार्पणात पाचपेक्षा अधिक बळी घेणारा एनगिडी सहावा गोलंदाज ठरला.

सांघिक कामगिरीची आवश्यकता
आम्ही चांगली भागीदारी करण्यात आणि आघाडी घेण्यात अपयशी ठरलो. पराभवासाठी आम्ही स्वत: जबाबदार आहोत. गोलंदाजांनी आपली भूमिका चांगली निभावली; पण फलंदाजांमुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. आम्ही प्रयत्न केले, परंतु आम्हाला यश आले नाही. विशेष करुन क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. जर आम्ही सामना जिंकलो असतो, तर निवडलेला संघ सर्वश्रेष्ठ ठरला असता का? सामन्यातील निकालानुसार आम्ही आमच्या संघाचा निर्णय घेत नाही.
- विराट कोहली

पहिल्या दिवसानंतर निराश होतो
गेल्या पाच दिवसांत खूप कठोर मेहनत घ्यावी लागली. पण, आम्ही वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरलो. हा खूप कठीण सामना होता, कारण बळी मिळवणे सोपे नव्हते. पहिल्या दिवसानंतर आम्ही खूप निराश होतो. त्यादिवशी अखेरच्या ४५ मिनिटांमध्ये आम्ही भारताला संधी दिल्या. परंतु, लवकरच आम्ही पुनरागमन केले आणि पुढील चार दिवस जिद्द दाखवली. पहिल्या डावात आम्ही अपेक्षित धावा काढू शकलो नाही.
- फाफ डूप्लेसिस

कसोटी धावफलक
द. आफ्रिका पहिला डाव : ३३५, भारत पहिला डाव : ३०७, द. आफ्रिका दुसरा डाव : २५८, भारत दुसरा डाव : मुरली विजय त्रि. गो. रबाडा ९, लोकेश राहुल झे. महाराज गो. एनगिडी ४, चेतेश्वर पुजारा धावबाद १९, विराट कोहली पायचित गो. एनगिडी ५, पार्थिव पटेल झे. मोर्केल गो. रबाडा १९, रोहित शर्मा झे. डिव्हिलियर्स गो. रबाडा ४७, हार्दिक पंड्या झे. डिकॉक गो. एनगिडी ६, आश्विन झे. डिकॉक गो. एनगिडी ३, मोहम्मद शमी झे. मोर्केल गो. एनगिडी २८, ईशांत शर्मा नाबाद ४, जसप्रीत बुमराह झे. फिलॅन्डर गो. एनगिडी २, अवांतर ५, एकूण : ५०.३ षटकांत सर्वबाद १५१ धावा. गडी बाद क्रम : १/११, २/१६, ३/२६, ४/४९, ५/६५, ६/८३, ७/८७, ८/१४१, ९/१४५, १०/१५१. गोलंदाजी : फिलॅन्डर १०-३-२५-०, रबाडा १४-३-४७-३, एनगिडी १२.२-३-३९-६, मोर्केल ८-३-१०-०, केशव महाराज ६-१-२६-०.

द. आफ्रिकेविरुद्ध कुठलीही तयारी नव्हती : बिशनसिंग बेदी
द. आफ्रिका दौ-यात गुडघे टेकून सलग दुसरी कसोटी गमाविणा-या भारतीय संघाच्या कचखाऊ वृत्तीचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांना मुळीच आश्चर्य वाटत नाही. बेदी यांच्या मते, द. आफ्रिका दौ-याची भारताची कुठलीही तयारी नव्हती. या संघाने लंकेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध खेळण्यात वेळ घालविला, अशी टीका बेदी यांनी केली.द. आफ्रिकेला रवाना होण्याआधी भारताने मायदेशात लंकेविरुद्ध कसोटी, वन डे आणि टी-२० मालिका खेळली. त्याआधीही ३ महिन्यांआधी लंकेविरुद्ध मालिका खेळविण्यात आली होती. मालिका पराभवानंतर बेदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना संघाची कुठलीही तयारी नव्हती, असे नमूद केले. ‘आम्ही लंकेविरुद्ध खेळण्यात वेळ घालविला. दीड महिना कमकुवत संघाविरुद्ध खेळण्यात अर्थ नव्हता. त्याऐवजी द. आफ्रिका दौºयाची तयारी करता आली असती. या कठीण दौºयासाठी कठोर तयारीची गरज होती. कुठलाही सराव सामना न करता भारत या मालिकेला सामोरे गेला. तथापि, या पराभवानंतर फार काळजी करण्याची गरज नाही. भारत कुठलेही आव्हान देऊ शकला नाही, हा चिंतेचा विषय आहे. गोलंदाजांनी चांगले काम केले. तथापि, झेल आणि फलंदाजी याबाबतीत काम करण्याची गरज आहे.’ भारताला याच वर्षी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाचादेखील दौरा करायचा आहे. पण द. आफ्रिका दौºयातील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहिल्यास भविष्यातील दौºयाबाबत चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले, असे वाटते.

Web Title: 'Lion of the World' 'Pile' abroad, India lost by 135 runs, series victory over series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.