वकिलांनी केले न्यायमूर्तींना आॅल आऊट !

एरवी न्यायालयामध्ये न्यायमूर्ती कायद्याच्या मुद्यांवर नेहमीच वकिलांची विकेट घेत असतात ! परंतु, क्रिकेटच्या मैदानावर न्यायमूर्तींचा वकिलांपुढे टिकाव लागला नाही. हायकोर्ट बार असोसिएशनच्यावतीने आयोजित मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात वकिलांनी न्यायमूर्तींना आॅल आऊट करून विजय मिळविला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:06 PM2018-02-18T21:06:20+5:302018-02-18T21:06:54+5:30

whatsapp join usJoin us
 Lawyers get justice out! | वकिलांनी केले न्यायमूर्तींना आॅल आऊट !

वकिलांनी केले न्यायमूर्तींना आॅल आऊट !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे मैत्रिपूर्ण क्रिकेट सामना रंगला : हायकोर्ट बार असोसिएशनची स्पर्धा

नागपूर : एरवी  न्यायालयामध्ये न्यायमूर्ती कायद्याच्या मुद्यांवर नेहमीच वकिलांची विकेट घेत असतात ! परंतु, क्रिकेटच्या मैदानावर न्यायमूर्तींचा वकिलांपुढे टिकाव लागला नाही. हायकोर्ट बार असोसिएशनच्यावतीने आयोजित मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात वकिलांनी न्यायमूर्तींना आॅल आऊट करून विजय मिळविला.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या सिव्हील लाईन्सस्थित मैदानावर रविवारी न्यायमूर्ती एकादश आणि वकील एकादश संघात रंगतदार सामना रंगला. न्यायमूर्ती एकादश संघात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. केमकर, न्या. भूषण गवई, न्या. प्रसन्न वराळे, न्या. रवी देशपांडे, न्या. सुनील शुक्रे, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. नितीन सांबरे, न्या. पी. डी. नाईक, न्या. एम. एस. कर्णिक व न्या. मनीष पितळे तर, वकील एकादश संघात अ‍ॅड. रवींद्र खापरे, अ‍ॅड. अनिल किलोर, अ‍ॅड. श्रीधर पुरोहित, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. अभय सांबरे, अ‍ॅड. आनंद देशपांडे, अ‍ॅड. मेहरोज पठाण, अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, अ‍ॅड. सुभाष जोशी व अ‍ॅड. नीलेश जांगीड यांचा समावेश होता. न्या. देशपांडे यांच्याकडे न्यायमूर्ती एकादश तर, अ‍ॅड. किलोर यांच्याकडे वकील एकादशच्या नेतृत्वाची धुरा होती.
सामना १५ षटकांचा होता. अ‍ॅड. किलोर यांनी नाणेफेक जिंकून न्यायमूर्ती एकादशला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्या. बोबडे व न्या. केमकर यांनी सलामीला येऊन २७ धावा जोडल्या. न्या. केमकर झेलबाद झाल्यानंतर न्या. बोबडे यांनी न्या. घुगे यांच्यासोबत मिळून धावसंख्या ४९ वर पोहोचवली. न्या. घुगेही झेलबाद झाले. तिघांचा अपवाद वगळता न्यायमूर्ती एकादशचे फलंदाज खेळपट्टीवर टिकून खेळू शकले नाही. परिणामी, त्यांचा डाव ८० धावांत संपुष्टात आला. वकील एकादशने हे आव्हान लीलया पूर्ण केले. त्यांनी ९ गडी राखून विजय मिळविला. सलामीवीर अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी नाबाद राहून सर्वाधिक ३३ धावांचे योगदन दिले. अ‍ॅड. अनिल किलोर यांनीही दमदार फलंदाजी करून दोन चौकारांसह ३१ धावा फटकावल्या.

न्या. बोबडे यांचे चार चौकार
न्या. शरद बोबडे यांनी १९ धावांच्या खेळीमध्ये सणसणीत चार चौकार फटकावले. त्यांनी केवळ १७ चेंडूत सर्वाधिक धावा जोडल्या. ते अ‍ॅड. आनंद देशपांडे यांच्या चेंडूवर बोल्ड झाले. या सामन्यात त्यांची खेळी आकर्षणाचे केंद्र होती.

अन्य न्यायमूर्तींनीही घेतला आनंद
अंतिम ११ सह अन्य न्यायमूर्तींनीही क्रिकेटचा आनंद घेतला. न्या. वासंती नाईक, न्या. झेड. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. विनय देशपांडे, न्या. रोहित देव, न्या. स्वप्ना जोशी व न्या. अरुण उपाध्ये यांनी वकिलांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक
न्यायमूर्ती एकादश : न्या. शरद बोबडे - १९, न्या. आर. व्ही. घुगे - १६, न्या. मनीष पितळे - नाबाद १३, न्या. रवी देशपांडे - १०, न्या. प्रसन्न वराळे - ०६, न्या. सुनील शुक्रे - नाबाद ०३, न्या. एम. एस. कर्णिक ०२, न्या. एस. एस. केमकर - ०१, न्या. पी. डी. नाईक - ०१.
गोलंदाजी : अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर - २५/२, अ‍ॅड. सुभाष जोशी - १४/२, अ‍ॅड. नीलेश जांगीड - ३४/२, अ‍ॅड. आनंद देशपांडे - १८/२.
वकील एकादश : अ‍ॅड. श्रीधर पुरोहित - नाबाद ३३, अ‍ॅड. अनिल किलोर - ३१, अ‍ॅड. अभय सांबरे - नाबाद ०५.

Web Title:  Lawyers get justice out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.