नवी दिल्ली : ललित मोदी यांनी श्निवारी नागोर जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रमुखपद सोडताच राजस्थान क्रिकेटमधील(आरसीए) त्यांचे प्रतिनिधित्व देखील संपुष्टात आले. आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे देश सोडून इंग्लंडमध्ये दडलेले आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांना आरसीएने स्वत:सोबत जोडताच बीसीसीआयने आरसीएवर बंदी घातली होती. काळेधन पांढरे केल्याचा मोदी यांच्यावर आरोप असून ५० वर्षांचे मोदी यांनी स्वत:चा राजीनामा आरसीएकडे पाठविला असून एक प्रत बीसीसीआय सचिव राहुल जोहरी यांच्याकडे पाठविली आहे. राजीनामा देणारे मोदी यांनी लिहिले,‘‘पुढील पिढीकडे जबाबदारी सोपविण्याची वेळ आली आहे.त्यामुळेच क्रिकेट प्रशासनाला ‘अलविदा’ करीत आहे.’’ आयपीएलमध्ये ग्लॅमर आणण्याचे श्रेय मोदी यांनाच जाते. आयपीएल लिलावात आर्थिक अफरातफर आणि काळे धन पांढरे करण्याचा ठपका ठेवून २०१० मध्ये बीसीसीआयने त्यांना निलंबित केले होते.(वृत्तसंस्था)