IPL 2019 KKR vs CSK: Imran Tahir get 4 wicket, KKR set target 162 runs to CSK | IPL 2019 KKR vs CSK : इम्रान ताहीरचा इंगा, कोलकाताच्या 161 धावा
IPL 2019 KKR vs CSK : इम्रान ताहीरचा इंगा, कोलकाताच्या 161 धावा

कोलकाता, आयपीएल 2019 : ख्रिस लीनच्या 82 धावांच्या खेळीवर चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहीरने पाणी फिरवले. ताहीरने कोलकाता नाइट रायडर्सच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकांत 8 बाद 161 धावा करता आल्या. ताहीरने 4 षटकांत 27 धावा देत 4 विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूरने दोन विकेट घेतल्या. 

ख्रिस लीनने कोलकाता नाइट रायडर्सकडून 1000 धावा करण्याचा विक्रम केला. त्याने पहिली धाव घेताच हा पल्ला पार केला. लीनने चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरच्या दोन षटकांत 22 धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मिचेल सँटनरला गोलंदाजीला आणले. आयपीएलच्या या सत्रात प्रथमच चहरला सलग तीन षटके टाकता आली नाही. सँटनरने कोलकाताच्या सुनील नरीनला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. नरीन 2 धावांवर माघारी परतला. कोलकाताला पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा करता आल्या. त्यात लीनच्या 38 धावा होत्या. लीनने फटकेबाजी करताना 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताने 10 षटकांत 1 बाद 77 धावा केल्या. नितीश राणा 11व्या षटकात तंबूत परतला, त्याला इम्रान ताहीरने बाद केले. राणाने 18 चेंडूंत तीन चौकारांसह 21 धावा केल्या. त्यानंतर आलेला रॉबीन उथप्पाही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यावेळेही फॅफ ड्यू प्लेसिसने उथप्पाचा झेल टिपला. पण, लीनच्या बॅटीतून धावांचा पाऊस सुरूच राहिला. त्याने संघाला नऊच्या सरासरीने धावा करून दिल्या. रवींद्र जडेजाच्या एकाच षटकात लीनने सलग तीन षटकार खेचले आणि संघाला शंभरी पार करून दिली. लीनचा हा झंझावात ताहीरने रोखला. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ताहीरने शार्दूल ठाकूरकरवी लीनला झेलबाद केले. लीनने 51 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 82 धावा केल्या. ताहीरने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. वादळी खेळी करण्यात तरबेज असलेल्या आंद्रे रसेलला त्याने बाद केले. रसेलला केवळ 10 धावा करता आल्या. कोलकाताच्या 15 षटकांत 5 बाद 133 धावा झाल्या होत्या. 15व्या षटकात ताहीरने ख्रिस लीन आणि आंद्रे रसेल या स्फोटक फलंदाजांना माघारी पाठवले. पण, हे षटक टाकण्यापूर्वी ताहीरने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीशी चर्चा केली होती. धोनीच्या विश्वासावर खरे उतरताना ताहीरने चेन्नईला यश मिळवून दिले. ताहीरने चार षटकांत 27 धावा देत 4 विकेट घेतल्या.


 


Web Title: IPL 2019 KKR vs CSK: Imran Tahir get 4 wicket, KKR set target 162 runs to CSK
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.