IPL 2019 CSK vs SRH : मनिष पांडेने संधी साधली, हैदराबादची चांदी झाली

IPL 2019: केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत फलंदाजीत बढती मिळालेल्या मनिष पांडेने संधीचं सोनं केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 09:35 PM2019-04-23T21:35:35+5:302019-04-23T21:35:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs SRH : Sunrisers Hyderabad set 176 runs target to Chennai Super Kings  | IPL 2019 CSK vs SRH : मनिष पांडेने संधी साधली, हैदराबादची चांदी झाली

IPL 2019 CSK vs SRH : मनिष पांडेने संधी साधली, हैदराबादची चांदी झाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत फलंदाजीत बढती मिळालेल्या मनिष पांडेने संधीचं सोनं केलं. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीनं शतकी भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादला मजबूत धावसंख्या उभारून दिली. वॉर्नरने आयपीएलमधील 43वे अर्धशतक पूर्ण केले, तर पांडेने नाबाद 83 धावा केल्या. हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ससमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. 


चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजीच्या निधनामुळे केन विलियम्सनला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी हैदराबाद संघाने अष्टपैलू शकीब अल हसनला संधी देण्यात आली. चेन्नईनेही शार्दूल ठाकूरच्या जागी हरभजन सिंगला संधी दिली. भज्जीनं पहिल्याच षटकात हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा सुरेख झेल टिपला. 


मनिष पांडेला आज फलंदाजीत बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पांडेने या संधीचा चांगला उपयोग केला. त्याने डेव्हिड वॉर्नरसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं हैदराबाद संघाला 10 षटकांत 1 बाद 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. पांडेने 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे 43वे अर्धशतक ठरले. 




चेन्नईविरुद्ध त्याचे हे सहावे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह त्याने शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पांडेचे हे आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने 2016मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध 26 चेंडूंत 50 धावांची खेळी केली होती. हरभजनने ही जोडी तोडली. त्याच्या गोलंदाजीवर धोनीनं वॉर्नरला यष्टिचीत केले. वॉर्नरने 45 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 57 धावा केल्या.  त्यानंतरही पांडेची फटकेबाजी सुरूच राहिली. 16 षटकांत हैदराबादने 2 बाद 138 धावा केल्या होत्या. विजय शंकरनेही दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळ केला. 79 धावांवर असताना पांडेला जीवदान मिळाले. दीपक चहरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने सोपा झेल सोडला. पण अखेरच्या चेंडूवर चहरने शंकरला बाद केले. शंकर आणि पांडे या जोडीनं 47 धावांची भागीदारी केली. 
 

Web Title: IPL 2019 CSK vs SRH : Sunrisers Hyderabad set 176 runs target to Chennai Super Kings 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.