IPL 2019 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्स 'प्ले ऑफ'मध्ये; वॉटसनची स्फोटक खेळी 

वॉटसनच्या 53 चेंडूंमध्ये शानदार 96 धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:48 PM2019-04-23T23:48:06+5:302019-04-23T23:51:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs SRH shane Watsons 96 helps Chennai beat Hyderabad | IPL 2019 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्स 'प्ले ऑफ'मध्ये; वॉटसनची स्फोटक खेळी 

IPL 2019 CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्स 'प्ले ऑफ'मध्ये; वॉटसनची स्फोटक खेळी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : निराशाजनक सुरुवातीनंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैना या जोडीची भागीदारीने चेन्नई सुपर किंग्सला सुस्थितीत आणले. रैना माघारी परतल्यानंतर वॉटसनने जबाबदारी खांद्यावर घेत चेन्नईचा विजय पक्का केला. चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचे 176 धावांचे लक्ष्य सहज पार केले. त्यांनी 6 विकेट राखून विजय मिळवत गुणतालिकेल अव्वल स्थान पटकावले आणि प्ले ऑफ मधील प्रवेशही निश्चित केला. वॉटसनने 53 चेंडूंत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. वॉटसनला  आयपीएलमधल्या पाचव्या शतकाने हुलकावणी दिली. 

केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत फलंदाजीत बढती मिळालेल्या मनिष पांडेने संधीचं सोनं केलं. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीनं शतकी भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादला मजबूत धावसंख्या उभारून दिली. वॉर्नरने आयपीएलमधील 43वे अर्धशतक पूर्ण केले, तर पांडेने नाबाद 83 धावा केल्या. हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ससमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पांडेने 49 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 83 धावा करत संघाला 3 बाद 175 धावांपर्यंत मजल मारून दिली. 




लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने थोडी सावधच सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात त्यांना धक्का बसला. सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस (1) धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नईच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकात रैनाने हैदराबादच्या संदीप शर्माच्या गोलंदाजीवर 22 धावा ( 4 चौकार व 1 षटकार) धावा चोपल्या. चेन्नईने 6 षटकांत 49 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईच्या धावांचा वेग हळुहळू वाढवला. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकडून वॉटसनचा झेल सुटला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉटसनच्या बॅटला चाटून यष्टिमागे गेला, परंतु बेअरस्टोपासून तो लांबच होता. तरीही बेअरस्टोने तो टिपण्याचा प्रयत्न केला. दहाव्या षटकात ही जोडी तुटली. रशीद खानने चेन्नईच्या रैनाला यष्टिचीत करून माघारी पाठवले. रैनाने 24 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 38 धावा केल्या. त्यानंतर वॉटसनने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेताना चेन्नईला विजय मिळवून दिला.








Web Title: IPL 2019 CSK vs SRH shane Watsons 96 helps Chennai beat Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.