IPL 2018 Virat Kohli fan tries to click selfie with him on pitch | IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो
IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो

बंगळुरू: आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी सुरक्षारक्षकांचं कवच भेदून थेट मैदानात धावणाऱ्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. भारतात क्रिकेटचं वेड सर्वाधिक असल्यानं अनेकदा असे प्रकार पाहायला मिळतात. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दोनवेळा याचा अनुभव घेतला आहे. आता असाच प्रकार रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत घडला. 

मूळचा दिल्लीकर असलेला विराट कोहली त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच फिरोझ शहा कोटला मैदानावर दिल्ली डेयरडेविल्सविरुद्ध फलंदाजी करत होता. पाचव्या षटकात कोहली नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून त्याच्या चाहत्यानं थेट मैदानात धाव घेतली. या चाहत्यानं कोहलीच्या पायाला स्पर्श केला. यानंतर खिशातून मोबाईल काढून त्यानं कोहलीसोबत सेल्फीदेखील काढला. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी मैदानावर धाव घेत चाहत्याला बाहेर काढलं. मात्र हा संपूर्ण प्रकार पाहून कोहलीला आश्चर्याचा धक्का बसला. 

शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सनं कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसमोर 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या सामन्यात कोहलीनं कर्णधारपदाला साजेशी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्यानं एबी डिव्हिलीयर्ससोबत 118 धावांची भागिदारी केली. कोहलीनं या सामन्यात 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर डिव्हिलीयर्सनं नाबाद 72 धावा करत संघाला 19 व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आरसीबीनं हा सामना पाच गडी राखून जिंकला. या विजयामुळे आरसीबीच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम आहेत. 
 


Web Title: IPL 2018 Virat Kohli fan tries to click selfie with him on pitch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.