भारताच्या विजयाचा ‘श्रीगणेशा’, टी-२० मध्ये किवी संघाला पहिल्यांदाच नमवले, नेहराला दिला विजयी निरोप

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:44 AM2017-11-02T02:44:22+5:302017-11-02T02:44:36+5:30

whatsapp join usJoin us
India's victory 'Shrignasha', defeated Kiwi team for the first time in T20, gave Nehra win | भारताच्या विजयाचा ‘श्रीगणेशा’, टी-२० मध्ये किवी संघाला पहिल्यांदाच नमवले, नेहराला दिला विजयी निरोप

भारताच्या विजयाचा ‘श्रीगणेशा’, टी-२० मध्ये किवी संघाला पहिल्यांदाच नमवले, नेहराला दिला विजयी निरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली. याआधी झालेल्या ६ टी-२० सामन्यांत न्यूझीलंडने ५ वेळा बाजी मारली असून एका सामन्याचा निर्णय लागला नव्हता. यासह विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोपही दिला.
येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने तुफान हल्ला करताना न्यूझीलंडपुढे विजयासाठी निर्धारित २० षटकांत २०३ धावांचे तगडे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० षटकांत केवळ ८ बाद १४९ एवढीच मजल मारता आली. पहिल्या षटकापासून दबाव निर्माण करण्यात यश मिळवलेल्या भारतीयांपुढे न्यूझीलंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मार्टिन गुप्टिल (४), कॉलिन मुन्रो (७) स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (२८) आणि टॉम लॅथम (३९) यांनी काहीसा प्रतिकार केला. हार्दिक पांड्याने विल्यम्सनला बाद केल्यानंतर ठराविक अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज बाद झाले आणि
भारताने दमदार विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, रोहित आणि शिखर यांनी प्रत्येकी ८० धावांची खेळी करून १५८ धावांची विक्रमी सलामी दिली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून ही सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली. या ‘हिटमॅन - गब्बर’ जोडीने भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. त्याचवेळी धवनला एक आणि रोहितला दिलेले दोन जीवदान न्यूझीलंडला चांगलेच महागात पडले. दुसºयाच षटकात टेÑंट बोल्टच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिखरचा सोपा झेल मिशेल सँटेनरने सोडला. यानंतर, ७ व्या व १८ व्या षटकात ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर अनुक्रमे टीम साऊदी व मार्टिन गुप्टिल यांनी रोहितचा झेल सोडला.
शिखरने ५२ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८० धावांचा तडाखा दिला, तर रोहितने ५५ चेंडंूत ६ चौकार व ४ षटकारांसह ८० धावा चोपल्या. ईश सोढीने १७ व्या षटकात शिखरला बाद केल्यानंतर याच षटकात धोकादायक हार्दिक पांड्यालाही परतवले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने केवळ ११ चेंडूंत ३ शानदार षटकार ठोकताना नाबाद २६ धावांची खेळी केली. महेंद्रसिंह धोनीनेही २ चेंडूंत एका षटकारासह नाबाद ७ धावा केल्या.
गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडला मजबूत चोप पडला. टेÑंट बोल्ट, टीम साऊदी आणि कॉलिन डी ग्रँडहोम या हुकमी वेगवान गोलंदाजांना अनुक्रमे १२.२५, ११ आणि १२.६६ च्या धावगतीने भारतीयांनी चोपले. त्यात, बोल्टने एक, तर इश सोढीने २ बळी
घेत भारतीयांच्या धावगतीला काही प्रमाणात ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.

कोटला नेहरामय...
सामना संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी नेहराला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली. या वेळी प्रेक्षकांनी मोठ्या जल्लोषामध्ये नेहराला घरच्या मैदानावर निरोप दिला. न्यूझीलंड फलंदाजीला आल्यानंतर सर्वांच्याच नजरा नेहरावर होत्या. आपल्या अखेरच्या सामन्यात बळी मिळवण्यात अपयशी ठरलेल्या नेहराने नियंत्रित मारा करत किवी फलंदाजांना फटकेबाजीची संधी दिली नाही. डावाच्या सुरुवातीलाच नेहराने किवी संघाला झटका दिला असता. पण त्याच्या गोलंदाजीवर मुन्रोचा झेल घेण्यात हार्दिक पांड्या अपयशी ठरला. यानंतर त्याच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सनचा झेल एका हाताने घेण्यात कोहलीही अपयशी ठरला. आपल्या कारकिर्दीतील अखेरचे षटक टाकण्यासाठी नेहरा सज्ज असताना प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले होते. यादरम्यान सुरक्षा कवच भेदून मैदानात धाव घेतलेल्या एका प्रेक्षकाने नेहराची भेट घेतली आणि त्याच्या पायांना स्पर्शही केला.

नेहराचा १८ वर्षांचा रोमांचक प्रवास
भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाºया आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २७ टी-२० सामन्यांत ३४ बळी मिळवले आहेत. आश्विनने ५२, तर बुमराहने ३८ बळी घेतले आहेत. नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४, तर १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा श्रेयस अय्यर भारताचा ७० वा खेळाडू
पहिल्यांदाच भारताने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतकी मजल मारली. रोहितने भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकताना सुरेश रैनाचा २६५ षटकारांचा विक्रम मोडला.
कोणत्याही विकेटसाठी रोहित - शिखर यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली. याआधी रोहित - कोहली
यांनी दुसºया विकेटसाठी
१३८ धावांची भागीदारी
केली होती.
प्रथम गोलंदाजी करत असताना पहिल्यांदाच पहिल्या १० षटकांत न्यूझीलंडला एकही बळी घेता आला नाही.
रोहित - शिखर यांनी सर्वाधिक ९८ चेंडू खेळताना सलामीवीर म्हणून मोठी भागीदारी केली. याआधी पाकिस्तानच्या कामरान अकमल - सलमान बट या सलामीवीरांनी बांगलादेशविरुद्ध ९५ चेंडू खेळले होते.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० बळी घेणारा तिसºया क्रमांकाचा गोलंदाज म्हणून नेहराने निरोप घेतला.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. लॅथम गो. बोल्ट ८०, शिखर धवन झे. लॅथम गो. सोढी ८०, हार्दिक पांड्या झे. लॅथम गो. ०, विराट कोहली नाबाद २६, महेंद्रसिंह धोनी नाबाद ७. अवांतर - ९. एकूण : २० षटकांत ३ बाद २०२ धावा. गोलंदाजी : मिशेल सँटेनर ४-०-३०-०; टेÑंट बोल्ट ४-०-४९-१; टीम साऊदी ४-०-४४-०; कॉलिन डी ग्रँडहोम ३-०-३४-०; ईश सोढी ४-०-२५-२; कॉलिन मुन्रो १-०-१४-०.

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. हार्दिक गो. चहल ४, कॉलिन मुन्रो त्रि. गो. भुवनेश्वर ७, केन विल्यम्सन झे. धोनी गो. हार्दिक २८, टॉम लॅथम यष्टिचित धोनी गो. चहल ३९, टॉम ब्रुस झे. रोहित गो. अक्षर १०, कॉलिन डी ग्रँडहोम झे. धवन गो. अक्षर ०, हेन्री निकोल्स धावबाद (कोहली) ६, मिशेल सँटेनर नाबाद २७, टीम साऊदी झे. धोनी गो. बुमराह ८, इश सोढी नाबाद ११. अवांतर - ९. एकूण : २० षटकांत ८ बाद १४९ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२९-०; यजुवेंद्र चहल ४-०-२६-२; भुवनेश्वर कुमार ३-०-२३-१; जसप्रीत बुमराह ४-०-३७-१; अक्षर पटेल ४-०-२०-२; हार्दिक पांड्या १-०-१०-१.

Web Title: India's victory 'Shrignasha', defeated Kiwi team for the first time in T20, gave Nehra win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.