कोहली-रहाणेने सावरले, भारताचे द. आफ्रिकेला २४१ धावांचे लक्ष्य

येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे , विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात 240 धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 07:05 PM2018-01-26T19:05:53+5:302018-01-27T04:48:27+5:30

whatsapp join usJoin us
India's grip on the third match, India's 222-run lead | कोहली-रहाणेने सावरले, भारताचे द. आफ्रिकेला २४१ धावांचे लक्ष्य

कोहली-रहाणेने सावरले, भारताचे द. आफ्रिकेला २४१ धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग: भारताने तिस-या कसोटीत तिस-या दिवसअखेर दुस-या डावात २४७ पर्यंत आव्हाननात्मक मजल गाठून यजमान द. आफ्रिकेला २४१ धावांचे विजयी लक्ष्य दिले आहे. मालिकेत भारतीय संघ ०-२ ने माघारला आहे. पहिल्या दोन्ही कसोटीतून वगळण्यात आलेला शैलीदार फलंदाज आणि संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे संधी मिळताच मदतीला धावून आला. त्याच्या ४८ कोहली ४१, भुवनेश्वर कुमार ३३ आणि मोहम्मद शमीच्या २७ धावांमळे भारताने दुसरा डाव २४७ पर्यंत खेचला.

या दौ-यात अजिंक्यला दोन्ही सामन्यात राखीव बाकावर बसवून ठेवण्यात आल्याने संघ व्यवस्थापनाला टीकेचे लक्ष्य व्हावे लागले होते. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी तर खेळवायचे नव्हते तर रहाणेला दौºयात नेलेच कसे? उपकर्णधाराला बाहेर बसविणारा कसोटी संघ मी तरी पाहिलेला नाही, अशा शब्दात रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना धारेवर धरले होते. तिस-या सामन्यात अजिंक्यला खेळविण्यात आले. तथापि, पहिल्या डावांत इतर फलंदाजांप्रमाणे तोही फ्लॉप ठरला होता. दुस-या डावात मोक्याच्या क्षणी त्याची बॅट तळपल्याने तळाच्या फलंदाजांच्या मदतीने त्याने झुंज दिली. त्याआधी सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांनी वेगवान खेळपट्टीवर संयमी खेळ केला.

उपाहारापर्यंत भारताने चार गडी गमावून शंभर धावा केल्या होत्या. विजय (१२७ चेंडूत २५ धावा) उपाहारापूर्वी बाद झाला. रबाडाने त्याची दांडी गूल केली. कोहलीने काही अप्रतिम फटके मारले. त्याने ४९ चेंडूंचा सामना करीत २७ आणि लोकेश राहुलने १६ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा मात्र सकाळच्या सत्रात बाद झाला. कोहली-विजय यांनी १८.५ षटके फलंदाजी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कोहलीला यादरम्यान चार धावांवर जीवदान मिळाले. मोर्केलच्या चेंडूवर अ‍ॅडन मार्करामने शॉर्ट लेगवर त्याचा झेल टिपण्याची संधी दवडली. चेंडू त्याच्या हाताला लागला, पण हातात विसावण्याआधीच काही सेकंदात तो जमिनीवर आदळला. भारताने ४० षटकांत शंभर धावांचा पल्ला गाठला. पाच चेंडूनंतर रबाडाने विजयला बाद केले.


उसळत्या खेळपट्टीने खेळाचा बेरंग...
जोहान्सबर्गची खेळपट्टी खराब असल्याच्या कारणास्तव पंचांना अखेर तिस-या दिवशी खेळ थांबवावा लागला. या खेळपट्टीवर चेंडू धोकादायकपणे उसळी घेत असल्याचे मत माजी दिग्गजांनी नोंदविल्यानंतर पंचांना दखल घ्यावी लागली. उभय कर्णधार, सामनाधिकारी आणि मैदानी पंच यांच्यात सल्लामसलत सुरू झाली. दरम्यान द. आफ्रिकेच्या दुस-या डावात भुवनेश्वर कुमारचा चेंडू डीन एल्गरच्या हातावर लागल्याने तो जखमी होताच अखेरच्या सत्रात खेळ थांबविण्यात आला. सकाळच्या सत्रात खेळपट्टीवर चेंडू चांगलेच उसळी घेत होते. त्यामुळे फलंदाज चाचपडत होते. दरम्यान पंच अलीम दार आणि इयान गोल्ड यांनी खेळपट्टीचे अनेकदा निरीक्षण केले. कासिगो रबाडाच्या ३१ व्या षटकांत चेंडू कोहलीच्या डाव्या पायाला लागला. ३५ व्या षटकांत विजयच्या डाव्या हातावर चेंडू आदळला. यामुळे पंचांनी दोनदा उभय कर्णधारांसोबत संवाद साधला. याचवेळी समालोचन करणारे मायकेल होल्डिंग यांनी या खेळपट्टीला शंभरपैकी दोन गुण देत आयसीसीने खेळपट्टी ‘बॅन’ करावी, अशी सूचना केली. काही फलंदाजांसाठी ही खेळपट्टी कर्दनकाळ ठरू शकते. यावर गंभीर जखम होण्याची भीती व्यक्त करीत होल्डिंग यांनी सर्वच फलंदाजांकडे कोहलीसारखे धैर्य आणि तंत्र नसते, अशी कोपरखळी मारली. द. आफ्रिकेचा माजी कर्णधार केपलर वेसल्स आणि माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनीही खेळपट्टीच्या असमतोल स्वरुपावर कठोर शब्दात टीका केली आहे.

खेळपट्टी कठीण: अमला
द.आफ्रिकेचा फलंदाजीतील आधारस्तंभ हशीम अमला यानेही जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजीसाठी खडतर असून, यावर चेंडूचा अंदाज बांधणे कठीण होत असल्याचे सांगताच गांगुलीच्या आक्षेपाला बळ लाभले. अमला म्हणाला,‘माझ्या मते जोहान्सबर्गची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी सर्वात कठीण खेळपट्टी आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही इंग्लंडमध्ये खेळलो, तिकडेही अशाच स्वरूपाच्या खेळपट्ट्या होत्या. मात्र जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना आमची चांगलीच तारांबळ उडाली. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर स्वत:ची विकेट वाचवीत धावा काढणे फारच आव्हानात्मक आणि धोकादायी आहे.’

धावफलक
भारत (पहिला डाव) : ७६.४ षटकांत सर्व बाद १८७ धावा.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ६५.५ षटकात सर्व बाद १९४ धावा.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय त्रि.गो. रबाडा २५, पार्थिव पटेल झे. मार्कराम गो. फिलँडर १६, लोकेश राहुल झे. डुप्लेसिस गो. फिलॅन्डर १६, चेतेश्वर पुजारा झे. डुप्लेसिस गो. मोर्केल १, विराट कोहली त्रि.गो. रबाडा ४१, अजिंक्य रहाणे झे. डिकॉक गो. मोर्केल ४८, हार्दिक पांड्या झे. आणि गो. रबाडा ४, भुवनेश्वर कुमार झे. डिकॉक गो. मोर्केल ३३, मोहम्मद शमी झे. डिव्हिलियर्स गो. एंगिडी २७, ईशांत शर्मा नाबाद ७, जसप्रीत बुमराह झे. रबाडा गो. फिलॅन्डर ००, अवांतर - २९. एकूण : ८०.१ षटकांत सर्वबाद २४७ धावा. बाद क्रम : १-१७, २/५१, ३/५७, ४/१००, ५/१३४, ६/१४८, ७/२०३, ८/२३८, ९/२४०,१०/२४७. गोलंदाजी : वेर्नोन फिलँडर २१.१-५-६१-३; कागिसो रबाडा २३-५-६९-३; मॉर्नी मॉर्केल २१-६-४७-३; लुंगी एंगिडी १२-२-३८-१, पेहुलकायो ३-०-१५-०.

Web Title: India's grip on the third match, India's 222-run lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.