वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा ‘क्लीनस्वीप’ देण्याचा निर्धार; घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर

तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया रविवारी भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लीनस्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:58 PM2017-12-23T12:58:51+5:302017-12-23T13:00:23+5:30

whatsapp join usJoin us
Indian team will try for clean sweep against Sri Lanka | वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा ‘क्लीनस्वीप’ देण्याचा निर्धार; घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा ‘क्लीनस्वीप’ देण्याचा निर्धार; घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया रविवारी भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लीनस्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल. त्याचवेळी सध्या लंकेला रडकुंडीला आणणारा कर्णधार रोहित शर्मा घरच्या मैदानावर कोणता पराक्रम करणार याचीच उत्सुकता भारतीयांना लागली आहे. दुसरीकडे, मालिकेतील उरली सुरली प्रतिष्ठा जपण्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत खेळेल. 

कटक आणि इंदूर येथे सलग दोन टी२० सामने जिंकून भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेत २-० असा कब्जा केला आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकून लंकेला क्लीनस्वीप देण्याच्या निर्धाराने टीम इंडियाने खेळेल. भारतीय संघ यासाठी लंकेला कोणतीही दयामाया दाखवणार नसल्याचे स्पष्ट असले, तरी त्यांची मुख्य मदार कर्णधार रोहित शर्मावर असेल. मोहाली येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त द्विशतक ठोकलेल्या रोहितने दुसºया टी२० सामन्यातही वेगवान शतकी तडाखा देत लंकेला अक्षरश: रडकुंडीला आणले. त्यांच्या कोणत्याच गोलंदाजाचा रोहितपुढे निभाव लागला नाही. त्यातच, गेल्या सामन्यात रोहितसह लोकेश राहुलनेही आपला झंझावात सादर करताना लंकेची आगीतून फुफाट्यात आल्यासारखी अवस्था केली होती. 

शिवाय मनिष पांडे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या असे एकाहून एक हिटर असलेल्या भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्याचे मुख्य आव्हान श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे असेल. शिवाय वानखेडेचे खेळपट्टी मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जात असली, तरी येथे अनेकदा गोलंदाजांचेही वर्चस्व पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे, यावेळी जर लंकेच्या गोलंदाजांनी नियंत्रित व अचूक मारा करण्यात यश मिळवले, तर त्यांना भारतीयांना मर्यादित धावसंख्येत रोखता येऊ शकते. परंतु, पुन्हा एकदा रोहित - राहुल जोडी बहरली, तर मात्र लंकेला धावांच्या तडाख्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. त्याचप्रमाणे कर्णधार म्हणून पहिला क्लीनस्वीप नोंदवण्याची सुवर्ण संधी मिळाली असल्याने रोहित शर्मा मुंबईत मजबूत संघ उतरवताना कोणतीही ढिलाई सोडणार नाही हे निश्चित.

गोलंदाजीमध्येही भारतासाठी फारशी अडचण नसेल. कुलदीप यादव - युझवेंद्र चहल यांनी लंकेच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवण्यात मोठे यश मिळवले आहे. या दोघांच्या फिरकीचा सामना करताना लंका फलंदाज अडखळताना दिसले. चहलने दोन्ही टी२० सामन्यांत प्रत्येकी ४ बळी घेत एकूण ८ बळींसह आपला दरारा निर्माण केला आहे.  कुलदीप आणि हार्दिक पांड्या यांनीही अनुक्रमे ५ व ४ बळी घेत चहलला चांगली साथ दिली आहे. 
दुसरीकडे, श्रीलंकेला मुंबईतील अखेरचा सामना जिंकून आपली उरली सुरली प्रतिष्ठा जपायची आहे. शिवाय, या विजयासह भारत दौऱ्याची विजयी सांगता करण्यासही त्यांचा प्रयत्न असेल. परंतु भारतीयांचा विशेष करुन रोहितचा सुरु असलेला धडाका पाहता त्यांच्यासाठी खडतर आव्हान असेल. त्यातच अनुभवी आणि हुकमी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याला इंदूरमध्ये दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला होता. त्यामुळे मुंबईत त्याच्या खेळण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

त्याचबरोबर मधल्या फळीतील अपयश श्रीलंकेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. निरोशन डिकवेला, उपुल थरंगा आणि कुशल परेरा यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपली छाप पाडण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीतही श्रीलंकेला विशेष काही करता आलेले नाही. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात चमक दाखवलेल्या सुरंगा लकमलच्या अनुपस्थितीमध्ये लंकेची गोलंदाजी कमजोर भासत आहे. त्यात भर म्हणजे मॅथ्यूज दुखापतग्रस्त झाला आहे. इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात मॅथ्यूजचा अपवाद वगळता लंकेच्या सर्वच गोलंदाजांची ११ हून अधिक धावगतीने धुलाई झाली होती. 

संभाव्य संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), बसील थम्पी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, महेंद्रसिंग धोनी, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, जयदेव उनाडकट आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), दुष्मंता चमीरा, अकिला धनंजय, चतुरंगा डिसिल्व्हा, निरोशन डिकवेला, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो, असेला गुणरत्ने, दानुष्का गुणतिलका, अँजेलो मॅथ्यूज, सचिथ पथिराणा, कुशल परेरा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका आणि उपुल थरंगा. 

वानखेडेचा रेकॉर्ड बदलणार का?
मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी असली, तरी येथील वानखेडे स्टेडियमवर मात्र भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. येथे आतापर्यंत भारताने दोन टी२० सामने खेळले असून दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. २२ डिसेंबर २०१२ मध्ये येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. यानंतर टी२० विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताला वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे लंकेविरुद्ध बाजी मारत या मैदानावर पहिला विजय मिळवण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.
 

Web Title: Indian team will try for clean sweep against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.