India vs South Africa, 4th ODI: India's eye on the historic title, the prestige of the team. Challenge ahead of Africa | India vs South Africa, 4th ODI: ऐतिहासिक जेतेपदावर भारताची नजर, प्रतिष्ठा राखण्याचे द. आफ्रिकेपुढे आव्हान
India vs South Africa, 4th ODI: ऐतिहासिक जेतेपदावर भारताची नजर, प्रतिष्ठा राखण्याचे द. आफ्रिकेपुढे आव्हान

जोहान्सबर्ग : विजयाचा अश्वमेध सुसाट निघाला असताना शनिवारी खेळल्या जाणा-या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवून ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाला चालून आली आहे. दुसरीकडे यजमान द. आफ्रिकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान असेल. मालिकेत ३-० अशी आघाडी मिळविलेल्या भारताला द. आफ्रिकेच्या भूमीत पहिल्या एकदिवसीय मालिका विजयासाठी एका विजयाची गरज आहे, याआधी २०१०-२०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने २-१ अशी आघाडी मिळविल्यानंतरही मालिका २-३ ने गमविली होती.
१९९२-९३ नंतर द. आफ्रिकेत झालेल्या द्विपक्षीय मालिकेत भारताने पहिल्यांदा सलग तीन एकदिवसीय सामने जिंकले. चौथा सामना जिंकून भारताला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये अव्वल स्थानाकडे कूच करण्याचीही संधी असेल. तिसºया एकदिवसीय सामन्याआधी शिखर धवन याने प्रत्येक सामना जिंकण्याची जिद्द असून संघात अतिआत्मविश्वास मुळीच नसल्याचे स्पष्ट केले होते. ३४ वे एकदिवसीय शतक ठोकणारा कर्णधार विराट कोहली याची आक्रमकता कायम आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी ३० पैकी २१ गडी बाद केले आहेत. कोहलीच्या आत्मविश्वासाचे हे एक कारण असावे.
यजमान संघाला दिलासा देणारी बाब म्हणजे धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स उर्वरित तिन्ही सामन्यात खेळणार आहे. बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तिन्ही सामन्यात तो खेळू शकला नव्हता. एडेन मार्करम हा संघाचा कर्णधार असेल.
डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये विंडीजविरुद्ध ४४ चेंडूत १४९ धावा ठोकल्या होत्या. त्याआधी २०१३ मध्ये भारताविरुद्ध त्याने ४७ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. द. आफ्रिकेविरुद्ध सलग ११ एकदिवसीय सामन्यात खराब फॉर्मशी झुंज देत आहे. संघ व्यवस्थापनासाठी हा चिंतेचा विषय ठरावा.
या मैदानावर भारताचा रेकॉर्ड साधारण आहे. भारताने येथे सात एकदिवसीय सामने खेळून
तीन जिंकले आणि चार
सामने गमावले. त्यात २००३ च्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा समावेश आहे. २०११ मध्ये याच मैदानावर भारताने द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविला होता. मुनाफ पटेलने त्यावेळी चार गडी बाद केले होते. (वृत्तसंस्था)

पिंक वन डे...
स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा एकदिवसीय सामना खेळविला जाईल. अशा प्रकारच्या सामन्याचे पहिल्यांदा आयोजन २०११ मध्ये झाले होते.
या सामन्यासाठी द. आफ्रिका संघ गुलाबी जर्सी परिधान करुन खेळतात. विशेष म्हणजे या गुलाबी जर्सीमध्ये खेळताना त्यांनी एकही सामना गमावलेला नाही.

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार), हाशिम अमला, जेपी ड्यूमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगी एंडिले, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, के. झोंडो, फरहान बेहार्डियेन, हेन्रिच क्लासेन , एबी डिव्हिलियर्स.


Web Title: India vs South Africa, 4th ODI: India's eye on the historic title, the prestige of the team. Challenge ahead of Africa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.