India Vs South Africa 2018 : वाँडरर्सवरचा यादगार चमत्कार!

चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमोर येतात. शनिवारी जोहान्सबर्गमधील वाँडरर्सचे क्रिकेट मैदान अशाच एक चमत्काराचे साक्षीदार झाले.

By Balkrishna.parab | Published: January 28, 2018 07:46 AM2018-01-28T07:46:15+5:302018-01-28T07:48:14+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 2018: A Wonderful Wonder of Wanderers! | India Vs South Africa 2018 : वाँडरर्सवरचा यादगार चमत्कार!

India Vs South Africa 2018 : वाँडरर्सवरचा यादगार चमत्कार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमोर येतात. शनिवारी जोहान्सबर्गमधील वाँडरर्सचे क्रिकेट मैदान अशाच एक चमत्काराचे साक्षीदार झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, चौफेर टीकेचे बोचकारे आणि दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांच्या वेगवान तोफखान्यासमोर शेकून निघालेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघाने वाँडरर्संवर एका चमत्कारिक विजयाची नोंद केली. 
 दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटात भारतीय संघासाठी कसोटी विजय हा नेहमीच हिरवळीप्रमाणे दुर्मीळ ठरत आलाय. त्यामुळे हा विजय निश्चितच साधासुधा नाही. त्यात पहिले दोन कसोटी सामने गमावल्याने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीवर गेल्या काही दिवसांपासून आजी माजी क्रिकेटपटूंनी सडकून टीका चालवली होती. त्यामुळे भारतीय संघासाठी विजय मिळवणे प्रतिष्ठेचा सवाल बनला होता. मात्र कर्णधार विराट कोहलीचे कुशल नेतृत्व, दुसऱ्या डावात स्वत: विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी खतरनाक खेळपट्टीवर केलेली जिगरबाज फलंदाजी, भुवनेश्वर आणि शमीने फलंदाजीत दिलेले मोलाचे योगदान आणि खेळाच्या चौथ्या दिवशी भुवनेश्वर, शमी, बुमरा आणि इशांत शर्माने केलेली अफलातून गोलंदाजी या सर्वाच्या जोरावर भारतीय संघाचा विजय साकार झाला.
 25 वर्षांपासून सुरू असलेला कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पण दक्षिण आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरणात फलंदाजी करणे भारताच्या दिग्गज फलंदाजांना मानवले नाही. घरच्या पाटा खेळपट्ट्यांमुळे विकेट्सच्याबाबतीत सदैव अर्धपोटी राहणाऱ्या गोलंदाजांनी संधीचा लाभ उठवला. पण फलंदाजीने दगा दिल्याने पहिल्या दोन सामन्यांतच पराभूत होऊन भारताला मालिका गमवावी लागली होती. कसोटी क्रिकेटमध्ये जोहान्सबर्गमधील अनुकूल इतिहास वगळता भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणावं, असं काहीच नव्हतं. त्यात प्रथम फलंदाजी आल्यावर  फलंदाजांनी पहिल्या दोन सामन्यातील कित्ताच पुढे गिरवत 200च्या आतच धाप टाकली. पण वाँडरर्सची खेळपट्टी भारतीय फलंदाजांप्रमाणेच यजमान फलंदाजांसाठीही व्हिलन ठरली. त्याचा फायदा उठवत बुमरा आणि कंपनीने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 194 धावांत उखडला. इथेच सामन्यात पुनरागमन करण्याची किंचित संधी भारतीय संघाला दिसू लागली. पण दुसऱ्या डावातही  पार्थिव पटेल, चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुल यांनी निराशा केली. मुरली विजयने नांगर टाकला खरा, पण त्याच्या बॅटमधून धावा काही निघाल्या नाहीत. मात्र विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची फलंदाजी दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी टर्निंग पाँइंट ठरली. आफ्रिकन गोलंदाजांचे उसळते चेंडू शरीर शेकवून काढत असताना विराट आणि अजिंक्य रहाणेने दुखापतींची पर्वा न करता खेळपट्टीवर उभे राहण्याचा निर्धार केला. ही गोष्ट छोटी होती, पण त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय संघाच्या आत्मविश्वासावर झाला.  या दोघांनीही इतर फलंदाजांसोबत छोट्या पण उपयुक्त भागीदाऱ्या करून संघाची आघाडी दोनशेपार नेली. 
खेळपट्टी हळुहळू अधिकच खराब होत असल्याने भारताने दिलेले 241 धावांचे आव्हान अशक्यप्राय होते. पण तिसऱ्या दिवशीच्या खेळात खेळपट्टीमुळे खेळ थांबण्यात आल्याने संभाव्य विजय भारताला हुलकावणी देतो की काय अशी शंका वाटू लागली. त्यात चौथ्या दिवशी अमला आणि एल्गर यांनी शतकी भागीदारी करून भारतीय संघाच्या हातून विजयश्री अक्षरश खेचलीच होती. पण इशांतच्या गोलंदाजीवर अमला बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा भक्कम बालेकिल्ला कोसळला. मग शमी, भुवनेश्वर आणि बुमरा यांनी आफ्रिकन फलंदाजीची दाणादाण उडवण्यात विलंब लावला नाही.  63 धावांनी मिळालेला विजय या सामन्यात किती रोमांचक लढत झाली. हे सांगण्यास पुरेसा आहे. भारतीय संघाचा जोहान्सबर्गमधील हा दुसरा तर दक्षिण आफ्रिकेमधील तिसरा विजय. या विजयामुळे कसोटी मालिकेचा निकाल विराटसेनेला बदलता आला नाही. पण हा विजय उर्वरित दौऱ्यात आणि पुढच्या काळात होणाऱ्या इंग्लड ऑस्ट्रेलियात दौऱ्यात भारतीय संघाला आत्मविश्वास मिळवून देईल, त्याबरोबरच वाँडरर्सवरचा हा चमत्कार क्रिकेटप्रेमींच्या नेहमीच आठवणीत राहील यात शंका नाही. 

Web Title: India vs South Africa 2018: A Wonderful Wonder of Wanderers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.