India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड'

'फिनिशर एमएसडी धोनी' ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात आज संपला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 10:13 PM2019-07-10T22:13:47+5:302019-07-11T11:26:19+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand World Cup Semi Final: Finisher 'End'! | India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड'

India Vs New Zealand World Cup Semi Final : महेंद्रसिंग धोनी नावाच्या सर्वोत्तम 'फिनिशर'चा 'एन्ड'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सुकृत करंदीकर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ज्या धडाकेबाज, धाडसी आणि अविश्वसनीय रणनितीनं भारताला आजवर अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले, करोडो क्रिकेटप्रेमींना न विसरता येणारा आनंद दिला...तीच रणनिती आज हरली. कधी ना कधी हे होणार होतंच. या अस्ताला वर्ल्डकपचा मुहूर्त मिळाला, हे भारतीय क्रिकेट संघाचं दुर्दैव. 'फिनिशर एमएसडी धोनी' ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात आज संपला. यशासारखं दुसरं काहीच नसतं आणि अपयशासारखं कडवंही काही नसतं.



 

रवींद्र जडेजानं एका बाजूनं हरलेला सामना जिंकण्याची उमेद निर्माण केलेली असताना दुसऱ्या बाजूला धोनी शांत उभा होता. आजवर नेहमी त्याला असंच बघायची सवय आहे. कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच न्यायची आणि मग हुकमी, ताकदी फटके चौफेर लगावत विजय साजरा करायचा, ही सवय महेंद्रसिंग धोनीनेच चाहत्यांना लावली होती. आजही त्याची पुनरावृत्ती होणार, अशी आशा त्यामुळंच जिवंत होती. प्रत्यक्ष मैदानात मात्र वेगळं घडत होतं. विजयासाठी आवश्यक धावगती 8 च्या पुढं गेल्यानंतर धोनीला आव्हान किती कठीण आहे, याची जाणीव झाली होती. पण त्याचा नेहमीचा सूर त्याला गवसत नव्हता. धोनीला आज चेंडूला सीमापार करणं शक्यच होत नव्हतं. त्यामुळं जमेल तेव्हा धाव घेत दुसऱ्या एंडला थांबणं तो पसंत करत होता. जीवापाड धावून एकाच्या दोन धावा गोळा करत होता. समोरून 'सर' जडेजाने चौकार-षटकरांची माळ लावल्याने धोनीवरचा ताण कमी होत होता. पण जडेजा बाद झाल्यानंतर स्वतः धोनीला आक्रमक होणं भाग होतं. एक षटकार खेचत त्याने प्रयत्न केला. पण तोवर खूप उशीर झाला होता. 

प्रतिस्पर्ध्याच्या हातातला विजय हिसकावून आणणारा धोनीचा 'मिडास स्पर्श' त्याच्या वाढत्या वयानं हिरावून घेतला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मधल्या फळीवर जेव्हा-जेव्हा जबाबदारी येऊन पडली तेव्हा ही फळी ओझ्याखाली दबून गेली. धोनी अपयशी ठरत असताना त्याची जागा घेणारंही कोणी दृष्टीक्षेपात येत नाही. रोहित-विराट पुढं सरसावल्यानं वीरू-सचिनची निवृत्ती एकदिवसीय संघाला कधी जाणवली नाही. धोनीचं विझणं अंधार वाढवणारं आहे. ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन यांच्यातलं कोणीच धोनीच्या जवळपासही नाही. 

स्वतः धोनीनं सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग, हरभजन या सारख्या अनेक महान खेळाडूंचा अस्त जवळून पाहिला आहे. यातल्या काहींचा अकाली अस्त धोनीनंच घडवून आणला असाही ठपका ठेवला जातो. आज धोनी तीच संध्याछाया अनुभवत असणार. थेट फेकीमुळं धावबाद झाल्यानंतर परतणाऱ्या धोनीची देहबोली बरंच काही बोलून जाणारी होती. वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ गारद झाल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर होतं. 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरल्याची व्यक्तिगत उदासी त्याच्या चेहऱ्यावर होती. या सगळ्याच्या तळाशी होती ती आपला डाव संपल्याची खोल जाणीव. पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या धोनीचा चेहरा मला हेच सांगत होता. केवळ भारतीय नव्हे तर जगाच्या क्रिकेट इतिहासात 'एमएसडी'सारखा धीरोदात्त पण तितकाच स्फोटक फिनिशर झालेला नाही. अशा महान खेळाडूचा 'एन्ड' पाहणं माझ्यासाठी भारताच्या पराभवापेक्षाही जास्त दुःखद आहे. 



 

कल्पना करा. धोनीनं त्याच्या 'हॉलमार्क' शैलीत मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये, त्यातही शक्यतो शेवटच्या चेंडूला सीमापार फेकून दिलं असतं तर... हाच धोनी हलकं स्मितहास्य करत स्वतःच्याच धुंदीत पॅव्हेलियनकडं परतला असता. स्टेडियममध्ये घुमणारा 'धोनी-धोनी-धोनी'च्या गगनभेदी गजरामुळं तो भारावून गेला नसता. संघातले सगळे खेळाडू आनंदानं चित्कारत अंगावर उड्या घेताहेत म्हणून फार तर चेहऱ्यावरची एखादी रेष हलली असती त्याच्या. बास. मग शांतपणे ग्लोव्हज काढून न्यूझीलंडच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं असतं. मनात आलंच असतं तर प्रेक्षकांना हात दाखवला असता आणि क्षणार्धात ड्रेसिंग रूममध्ये गडप झाला असता. यातलं काही घडलं नाही. मैदानात नेहमीच निर्विकार असणाऱ्या धोनीचा चेहरा आज बोलत होता आणि त्यातून निघणारे सूर हरलेले होते.

Web Title: India vs New Zealand World Cup Semi Final: Finisher 'End'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.