India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

India vs New Zealand 3rd T20: स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 11:33 AM2019-02-10T11:33:22+5:302019-02-10T11:45:12+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 3rd T20: Unlucky Mithali Raj; Indian women defeated by NZ Women in thrilling match | India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय महिला संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत पराभव पत्करावा लागलान्यूझीलंड महिला संघाने दोन धावांनी सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवले

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत थरार रंगला, परंतु अखेरीस भारताला अवघ्या 2 धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने या विजयासह मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. मिताली राजला अखेर संधी मिळाली, परंतु ती संघाला विजय मिळवून देण्यास असमर्थ ठरली. तिने 20 चेंडूंत नाबाद 23 धावा केल्या. भारताला 4 बाद 159 धावाच करता आल्या. 




सोफी डेव्हिनच्या ( 72) फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय महिलांसमोर 162 धावांचे आव्हान उभे केले आहे. डेव्हियनने 52 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 72 धावा केल्या. तिला कर्णधार अॅमी सॅटर्थवेट ( 31) आणि सुजी बेट्स ( 24) यांनी चांगली साथ दिली. भारताच्या दिप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या. 


लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर प्रिया पुनिया (1) पुन्हा अपयशी ठरली. त्यानंतर स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी भारताचा डाव सावरला. स्मृती आक्रमक खेळ करत होती, तर जेमिमा तिला तोलामोलाची साथ देत होती.  या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करताना संघाच्या धावांचा वेग वाढवला. स्मृतीने 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना किवी गोलंदाजांची धुलाई केली. 


स्मृती आणि जेमिमा यांची भागीदारी 9 व्या षटकात संपुष्टात आली. 17 चेंडूंत 3 चौकारांसह 21 धावा करणाऱ्या जेमिमाला किवी गोलंदाज डेव्हिनने बाद केले. स्मृती व जेमिमा यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत दुसऱ्या विकेटसाठी अनुक्रमे 98, 63 आणि 47 धावांच्या भागीदारी केल्या आहेत. त्यानंतर आलेली कर्णधार हरमनप्रीत कौरही ( 2) लगेच तंबूत परतली. त्यानंतर स्मृती व मिताली राज यांनी संयमी खेळ केला, परंतु 16 व्या षटकात ही जोडी फुटली. जबरदस्त फॉर्मात असलेली स्मृती 86 धावांवर माघारी परतली. स्मृतीने 62 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकार खेचून 86 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील तिची ही सर्वोत्तम खेळी ठरली.  


त्यानंतर मिताली आणि दिप्ती शर्मा यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना मितालीने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर दिप्तीने खणखणीत चौकार खेचून धावा व चेंडू यातील अंतर कमी केले. पुढच्याच चेंडूवर दोन धावा घेत भारतीय खेळाडूंनी किवींच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. हा सामना 1 चेंडू 4 धावांची गरज असताना मितालीला एकच धाव घेता आली. भारताला 2 धावांची सामना गमवावा लागला. 

Web Title: India vs New Zealand 3rd T20: Unlucky Mithali Raj; Indian women defeated by NZ Women in thrilling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.