India vs Australia 5th ODI : Kedar Jadhav, Bhuvneshwar Kumar script unique record with 91-run partnership  | India vs Australia 5th ODI : भारतीय संघ हरला, पण केदार जाधव, भुवनेश्वर कुमार यांनी इतिहास रचला
India vs Australia 5th ODI : भारतीय संघ हरला, पण केदार जाधव, भुवनेश्वर कुमार यांनी इतिहास रचला

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी पाचव्या वन डे सामन्यात भारताच्या विजयासाठी कडवी झुंज दिली, परंतु ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला 35 धावांनी नमवून मालिका 3-2 अशी जिंकली. घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला प्रथमच मालिका पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून आघाडी घेतली होती, परंतु कांगारूंनी जोरदार कमबॅक करताना ऐतिहासिक विजय मिळवला. 2009 नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. रोहित शर्मानं ( 56) अर्धशतकी खेळी करताना कर्णधार कोहलीसह 53 धावांची भागीदारी केली. मात्र, भारताच्या मधल्या फळीनं सपशेल निराश केले. रिषभ पंत, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा यांना अपयश आहे. मात्र, जाधव आणि भुवनेश्वर यांनी भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. या दोघांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला.  जाधवने 44 आणि भुवीने 46 धावा करताना सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी हरभजन सिंग आणि प्रविण कुमार यांच्या विक्रमी भागीदारीचा विक्रमा मोडला. या दोघांनीही 2009 साली वडोदरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांचा पाठलाग करताना सातव्या विकेटसाठी 84 धावा जोडल्या होत्या.  भुवी आणि जाधवच्या प्रयत्नानंतरही भारताचा डाव 237 धावांवर गडगडला. अॅडम झम्पाने 46 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्यानं रोहित शर्मा, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा या महत्त्वाच्या खेळाडूंना माघारी पाठवले. विशेष म्हणजे त्याने 29व्या षटकात रोहित व जडेजा या दोन प्रमुख खेळाडूंना बाद करून सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकवला.

ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांनंतर भारताला वन डे मालिकेत नमवले
ऑस्ट्रेलियाने 2009 साली भारतात वन डे मालिकेत 4-2 असा विजय मिळवला होता. त्यानंतर 2010 ( 0-1), 2013 ( 2-3) आणि 2017 (1-4) साली ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत केवळ चारच संघांना 0--2 अशा पिछाडीवरून वन डे मालिका जिंकता आल्या आहेत. यात दक्षिण आफ्रिकेने ( पाकिस्तान 2003 आणि इंग्लंड 2016) दोन वेळा असा पराक्रम केला आहे, तर पाकिस्तान ( भारत 2015) आणि बांगलादेश ( झिम्बाब्वे 2005) यांनी प्रत्येकी एक वेळा अशी कामगिरी केली आहे. या यादित आता ऑस्ट्रेलियाचा संघ दाखल झाला आहे. 


Web Title: India vs Australia 5th ODI : Kedar Jadhav, Bhuvneshwar Kumar script unique record with 91-run partnership 
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.