अफगाणिस्तान भुईसपाट; भारत 1 डाव आणि 262 धावांनी विजयी

अफगाणी संघ एकाच दिवशी दोनवेळा भारतीय गोलंदाजांसमोर गारद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 05:37 PM2018-06-15T17:37:31+5:302018-06-15T17:53:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan test India win by an innings and 262 runs | अफगाणिस्तान भुईसपाट; भारत 1 डाव आणि 262 धावांनी विजयी

अफगाणिस्तान भुईसपाट; भारत 1 डाव आणि 262 धावांनी विजयी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु: मर्यादित षटकांच्या सामन्यात चमकदार कामगिरी करुन कसोटी संघाचा दर्जा मिळवणारा अफगाणिस्तानचा संघ ऐतिहासिक कसोटीत भारतासमोर भुईसपाट झाला. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतल्यावर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली. आपला पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघावर एकाच दिवशी दोनवेळा तंबूत परतण्याची नामुष्की ओढवली. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला हा सामना भारतानं 1 डाव आणि 262 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे हा कसोटी सामना भारतानं अवघ्या 2 दिवसांमध्ये खिशात घातला.  

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. आजच्या पहिल्या सत्रात हार्दिक पांड्यानं फटकेबाजी केली. त्यामुळे भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 474 धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुवात झाली. मात्र अफगाणिस्तानचे सर्वच फलंदाज हजेरीवीर ठरले. अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला 25 पेक्षा जास्त धाव करता आल्या नाहीत. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद नबीनं केलेल्या 24 धावा ही अफगाणी फलंदाजांमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक मारा केला. रवीचंद्रन अश्विननं 4, रवींद्र जाडेजानं, ईशांत शर्मानं प्रत्येकी 2 तर उमेश यादवनं 1 विकेट घेत पाहुण्या संघाचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला.

पहिल्या डावातील घसरगुंडीमुळे अफगाणिस्तानला फॉलोऑनचा सामना करावा लागला. मात्र दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची फलंदाजी कोसळली. पाचव्या क्रमांकावर आलेला हश्मतुल्ला शाहिदीनं नाबाद 36 धावा करत एक बाजू लावून धरली. मात्र दुसऱ्या बाजूनं अफगाणिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. भारताकडून जाडेजानं 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर उमेश यादवनं 3, ईशांत शर्मानं 2 आणि रवीचंद्रन अश्विननं एका फलंदाजाला बाद केलं. अफगाणिस्तानचा दुसरा डाव 103 धावांत आटोपला. त्यामुळे हा सामना भारतानं 1 डाव आणि 262 धावांनी जिंकला. पहिल्या डावात आक्रमक शतकी खेळी साकारणाऱ्या शिखर धवनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
 

Web Title: India vs Afghanistan test India win by an innings and 262 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.