IND vs SA: Virat Kohli and Smriri Mandhana hits century against SA | IND vs SA: 18 नंबरच्या जर्सीची कमाल, विराट कोहली आणि स्मृती मानधनाने ठोकलं शतक
IND vs SA: 18 नंबरच्या जर्सीची कमाल, विराट कोहली आणि स्मृती मानधनाने ठोकलं शतक

किम्बर्ले - भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांमधील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने आघाडी घेतली आहे. तिस-या सामन्यात भारताने 124 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताचा एकदिवसीय मालिकेतील हा सलग तिसरा विजय होता. एकीकडे भारतीय पुरुष संघ दक्षिण आफ्रिकेत जबरदस्त कामगिरी करत असताना, महिला संघानेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळत आहेत. बुधवारी महिला संघाने किम्बर्लेत दक्षिण आफ्रिकेचा 178 धावांनी पराभव केला.  तीन सामन्यांच्या मालिकेत संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि फायनल सामना शनिवारी होणार आहे. 

भारतीय महिला संघातील फलंदाज स्मृती मानधनाने शतक ठोकत 135 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत नेलं. भारताने प्रथम फलंदाजी करत स्मृती मानधनाने केलेल्या शतकाच्या जोरावर 3 विकेट्स गमावत 302 धावा ठोकल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे बुधवारी महिला आणि पुरुष दोन्ही भारतीय संघांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात विजय मिळवला, आणि दोन भारतीय खेळाडूंच शतक या विजयात महत्वाचं ठरलं. एकीकडे विराट कोहलीने 160 धावा केल्या, तर महिला संघाकडून स्मृती मानधनाने 135 धावा ठोकल्या. योगायोग म्हणजे दोन्ही खेळाडूंचा जर्सी नंबर 18 आहे. 18 नंबर जर्सी असलेल्या दोन्ही खेळाडूंनी शतक ठोकत संघाला दक्षिण आफ्रिकेविरोधात विजय मिळवून दिला. 

सलामीवीर स्मृती मानधनाच्या तडाखेबंद 135 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी दुस-या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 178 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली. या विजयामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी वूमेन्स चॅम्पियनशिपमध्ये 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. डावखुºया स्मृती मानधनाने 129 चेंडूंतच केलेल्या 135 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने 3 बाद 302 धावांचा एव्हरेस्ट उभारला. स्मृतीने तिच्या शतकी खेळीत 14 चौकार आणि एक षटकार ठोकला. मानधनाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेतील हे दुसरे शतक ठरले. याआधीच्या लढतीत मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेतील भारताच्या विजयात 98 चेंडूंत 84 धावांची नेत्रदीपक खेळी केली होती. स्मृती मानधनाशिवाय हरमनप्रीत कौरने नाबाद ५५ आणि वेदा कृष्णमूर्तीने नाबाद 51 धावांचे योगदान दिले. भारतीय महिला फलंदाजांच्या स्फोटक खेळीसमोर दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज हतप्रभ दिसत होते. त्यांना फक्त 3 गडी बाद करता आले. त्यांच्याकडून स्युन लुस हिने 31 धावांत 1 गडी बाद केला. 
 


Web Title: IND vs SA: Virat Kohli and Smriri Mandhana hits century against SA
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.