ICC World Cup 2019 : अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!

संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी  मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले.

By बाळकृष्ण परब | Published: July 11, 2019 06:34 PM2019-07-11T18:34:27+5:302019-07-11T18:37:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Why Indian Cricket Team Loss ICC Cricket World Cup Semi finale   | ICC World Cup 2019 : अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!

ICC World Cup 2019 : अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- बाळकृष्ण परब 

अखेर जे न व्हायचे तेच झाले. अघटित घटले. क्षणात होत्याचे नव्हते झाले अन् आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. विराटसेनेसह विश्वचषकाला गवसणी घालू पाहणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे स्वप्न भंगले. संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी  मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले.

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला संघ विजेतेपदासाठी फेवरिट होता. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरसारखे गोलंदाज, हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू आणि धोनीसारखा अनुभवी चतुर यष्टीरक्षक दिमतीला असल्याने क्रिकेटप्रेमींनाही या संघाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. आपल्या संघानेही प्राथमिक फेरीत एकापेक्षा एक धडाकेबाज विजय मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. अगदी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पहिल्या डावापर्यंत सारे काही सुरळीत चालले होते. पण फलंदाजीला सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या-पाऊण तासातच होत्याचे नव्हते झाले. खरं सांगायचं तर  न्यूझीलंडला सहज नमवू हा अतिआत्मविश्वास आपल्या संघाला नडला. 


अडखळत धडपडत सेमीफायनलपर्यंत आलेल्या न्यूझीलंडला अवघ्या 239 धावांत रोखल्यानंतर आता अंतिम फेरीतील प्रवेश ही केवळ औपचारिकताच उरली आहे असा समज आपल्या संघाने करून घेतला असावा, असे वाटते. त्यामुळेच फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी आधी 240 धावांचा पल्ला गाठावा लागेल हेच त्यांच्या ध्यानी राहिले नसावे. आपल्या डावाला सुरुवात होते न होते तोच मिशन वर्ल्डकपमध्ये मर्दुमकी गाजवणारे रोहित शर्मा विराट कोहली आणि लोकेश राहुल धारातीर्थी पडले. सेनापतीसह दोन खंदे योद्धे पडल्याने टीम इंडियाच्या छावणीत पळापळ सुरू झाली. अशा परिस्थितीत खेळपट्टीवर नांगर टाकून डाव सावरणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता असते. पण असा खेळाडूच संघात नसल्याने आणि उपलब्ध असलेल्या धोनीची खालच्या फळीत रवानगी करण्यात आल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली. दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या बेजबाबदार खेळ करत संघाच्या अडचणी वाढवून मागे फिरले.  
 पुढे 6 बाद 92 अशा केविलवाण्या स्थितीत सापडलेल्या संघाला रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने एक अशक्यप्राय विजय मिवळून देण्याच्या प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यामुळे व्हेंटिलेटरवर पोहोचलेल्या भारताच्या डावात तरतरी आणण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.  

आता नेमकी चूक कुठे झाली? या पराभवाला जबाबदार कोण? याचे चर्वितचर्वण सालाबादप्रमाणे सुरू झाले आहे. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केल्यानंतर अगदी मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्ध्याला गृहित धरण्याची चूक अतिआत्मविश्वासाने भारलेल्या भारतीय संघ आणि संघव्यवस्थापनाकडून झाली. त्यातून उपांत्य लढतीसारख्या लढतीत संघात अनाकलनीय बदल केले गेले. माफक आव्हान पार करताना सुरुवातीला आवश्यकते गांभीर्य दाखवले गेले नाही. काही फलंदाजांनी आपल्याच धुंदीत खेळ केला. त्यामुळे अतिआत्मविश्वासाने घात केला आणि टीम इंडियाच्या हातचा वर्ल्डकप निसटून गेला! असेच या पराभवाबाबत म्हणावे लागेल.

Web Title: ICC World Cup 2019 : Why Indian Cricket Team Loss ICC Cricket World Cup Semi finale  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.