ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

शंकरच्या दुखापतीबाबत अजूनही भारतीय संघ व्यवस्थापनेने काहीही स्पष्ट केलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:27 PM2019-06-20T16:27:34+5:302019-06-20T16:28:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Vijay Shankar injured for second time in World Cup | ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

ICC World Cup 2019: विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बुधवारी सराव करत असताना विजय शंकरच्या पायाला दुखापत झाली आहे. पण या विश्वचषकादरम्यान शंकरला ही पहिल्यांदाच दुखापत झालेली नाही. विश्वचषकाला काही तासांचा अवधी असतानाच शंकरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही सराव सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. आता झालेल्या दुखापतीनंतर तो किती सामन्यांना मुकणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. 

विश्वचषक सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये सराव करत होता. त्यावेळी वेगवान गोलंदाज खलील अहमदचा एक चेंडू शंकरच्या डाव्या हाताला लागला होता. हा चेंडू एवढ्या जोरात शंकरला लागला की त्यानंतर तो थेट मैदान सोडून गेला होता. त्यावेळी शंकरची ही दुखापत गंभीर असल्याचे बऱ्याच जणांना वाटले होते. शंकरच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचेही म्हटले गेले होते. पण अखेर वैद्यकीय चाचणीचे अहवाल आल्यानंतर शंकरच्या हाताला फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शंकर फिट झाल्यावरही त्याला सराव सामन्यात खेळवले नव्हते. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात शंकरला संधी देण्यात आली नाही. त्याचबरोबर मंगळवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही शंकरला विश्रांती देण्यात आली होती.

बुधवारी भारतीय संघ सराव करत होता. यावेळी विजय शंकर फलंदाजीचा सराव करत होता आणि त्याला जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. यावेळी बुमराचा एक चेंडू शंकरच्या पायाला लागला आणि त्यानंतर शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर काही वेळ शंकर बसूनच होता. पण आता त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत आणि तो लवकरच फिट होईल, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. सलामीवीर शिखर धवन, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर भारताला आज तिसरा धक्का बसला आहे. शंकरच्या दुखापतीने भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शंकरच्या दुखापतीबाबत अजूनही भारतीय संघ व्यवस्थापनेने काहीही स्पष्ट केलेले नाही. ही दुखापत किती गंभीर आहे आणि शंकरला किती दिवस विश्रांती घ्यावी लागेल, याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनेने अद्याप भाष्य केलेले नाही. त्यामुळे शंकर आगामी कोणत्या सामन्यांमध्ये खेळू शकेल, याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. धवनला तर विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर भुवेनश्वर कुमारच्या दुखापतीबाबतही भारतीय संघ व्यवस्थापनेने कोणतेही अपडेट दिलेले नाही.

Web Title: ICC World Cup 2019: Vijay Shankar injured for second time in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.