ICC World Cup 2019 : या पाच गोलंदाजांवर असणार क्रिकेटविश्वाचे लक्ष!

इंग्लंडमध्ये होणाऱ्या यंदाच्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत फलंदाजांचा बोलबाला राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे, पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:38 PM2019-05-17T17:38:44+5:302019-05-17T17:40:59+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: This five bowlers make impact in World cup 2019! | ICC World Cup 2019 : या पाच गोलंदाजांवर असणार क्रिकेटविश्वाचे लक्ष!

ICC World Cup 2019 : या पाच गोलंदाजांवर असणार क्रिकेटविश्वाचे लक्ष!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या यंदाच्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत फलंदाजांचा बोलबाला राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वन डे मालिकेतूनही हेच दिसून येत आहे. फलंदाज खोऱ्याने धावा काढत असताना गोलंदाजांची बेदम धुलाई होत आहे. सपाट खेळपट्टी, उष्ण वातावरण यामुळे विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल असे म्हटले जात आहे. मात्र असे असले, तरी काही वेगवान गोलंदाज असे आहेत, जे आपल्या अचूकतेच्या जोरावर कोणत्याही फलंदाजाला स्वस्तात तंबूची वाट दाखवू शकतात. अशा गोलंदाजांविरुद्ध खेळताना फलंदाजांना आपल्या आक्रमकतेला काही प्रमाणात मुरड घालावीच लागेल. त्याअनुशंगानेच वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांसाठी धोकादायक ठरतील अशा अव्वल पाच गोलंदाजांवर टाकलेली नजर...

१. कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) :
२०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रबाडाने अल्पावधीतच क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. वेग, उसळी आणि स्विंग या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेला अनेक बळी मिळवून दिले आहेत. नुकत्याच आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत पर्पल कॅपवर जवळपास कब्जा केलेलाच होता. मात्र, अखेरच्या काही सामन्यांत दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही आणि ही संधी साधत दक्षिण आफ्रिकेच्याच इम्रान तहिरने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सकडून रबाडाने १२ सामन्यांतून २५ बळी मिळवले होते. आता तो दुखापतीतून सावरत आहे. रबाडाचा अचूक माऱ्याचा सामना करणे सर्वच आघाडीच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरेल. 

२. जसप्रीत बुमराह (भारत) :
डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट बुमराहचा धसका सर्वच फलंदाजांना असेल. गोलंदाजीची वैशिष्ट्यपूर्ण शैली ही बुमराहची मोठी ताकद आहे. सध्या क्रिकेटविश्वाचे लक्ष बुमराहकडे लागले असून तो भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान देऊ शकतो. एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत अव्वल गोलंदाज असलेला बुमराह वेग, भेदक यॉर्कर, चेंडूला उसळी देण्याची क्षमता आणि अप्रतिम मिश्रण याजोरावर भल्याभल्या फलंदाजांना दबावाखाली आणू शकतो. यंदा बुमराहने आयपीएलमध्ये १६ सामन्यांतून १९ बळी घेतले. 

३. मिशेल स्टार्क ( ऑस्ट्रेलिया ) :
ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विश्वविजेता बनविण्यात डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्क मोलाचे योगदान देऊ शकतो. गेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक २२ बळी मिळवताना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला होता. यानंतर मात्र त्याची कामगिरी खालावली असली, तरी तो विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी फलंदाजांची चांगलीच कोंडी करु शकतो. 
    


४. हसन अली (पाकिस्तान) : 
पाकिस्तानने २०१७ साली इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाजी मारली होती. या स्पर्धेत १३ बळी घेत हसन अलीने पाकिस्तानच्या विजेतेपदामध्ये मोठे योगदान दिले होते. कोणत्याही क्षणी तो संघाला बळी मिळवून देऊ शकतो. आतापर्यंत ४४ सामन्यांमध्ये त्याने ७७ बळी मिळवले असून हसल अली अपेक्षित कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर पाकिस्तान पुन्हा एकदा विश्वविजेतेपद उंचावण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास कर्णधार सर्फराज अहमदला आहे. 

५. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) :
गेल्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या तुफान वेगाने सर्वांची भांबेरी उडवलेल्या बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कप्रमाणेच २२ बळी मिळवले होते. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता राखून असलेल्या बोल्टचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसेल. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात यश आलेले नाही.

Web Title: ICC World Cup 2019: This five bowlers make impact in World cup 2019!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.