ICC World Cup 2019 : विराट मनाचा कॅप्टन कोहली... 

ICC World Cup 2015: विराट कोहली... असं म्हणतात, तू आगाऊ आहेस, खरंच तू तसा आहेस?

By स्वदेश घाणेकर | Published: June 10, 2019 09:33 AM2019-06-10T09:33:12+5:302019-06-10T09:39:56+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2015: Virat Kohli's incredible gesture for Steve Smith during Ind vs Aus clash is winning hearts | ICC World Cup 2019 : विराट मनाचा कॅप्टन कोहली... 

ICC World Cup 2019 : विराट मनाचा कॅप्टन कोहली... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर

खरा खेळाडू तो जो प्रतिस्पर्ध्याचाही आदर राखतो. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी तो जिवाचं रान करेल, परंतु त्याचा अपमान होईल असे कृत्य ना स्वत: करणार, ना दुसऱ्याला करू देणार. कोणत्याही खेळाचा हाच महत्त्वाचा गाभा आहे. त्याचा ठाव घेणे सर्वांना जमतेच असे नाही. अनुभव हे शिकवत असतो आणि त्यातून प्रगल्भ होत हा गाभा शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. मैदानावरील कामगिरी आणि वर्तन हे खेळाडूला महानतेच्या पंक्तीत बसवते. आता या पंक्तीत विराट कोहली बसला, असे म्हणायला हरकत नाही. त्याची मैदानावरील कामगिरी हे त्यामागचं कारण नाही, तर त्यानं केलेली एक कृती आहे.


सतत तोंडात शिव्या (दिल्लीश्वर असल्यानं ते ओघानं येत राहणं साहजिकच आहे. पण आपल्याला जगभरात चाहतावर्ग आहे, याचं भान राखून तरी वागावं), अतिआक्रमकपणा आणि त्यातून येणारा द्वेष, प्रतिस्पर्ध्यांना सतत डिवचणं, सहकारी चुकला की तोंडातून अ. भ. ची भाषा, ही कर्णधार कोहलीची आतापर्यंतची ओळख. आतापर्यंतचीच, कारण वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या 'विराट' मनाची प्रचिती आली. विराट म्हटलं की चटकन मनात उभी राहणारी आगाऊ खेळाडूची प्रतिमा आज परिपक्व व दिलदार मनाच्या खेळाडूनं घेतली. 


भारत-ऑस्ट्रेलिया समोरासमोर आले की टशन, खून्नस आलच. पण काल झालेल्या सामन्यात हे काहीच नव्हतं. केवळ होत ते Pure Cricket. पण या शुभ्रतेला अधिक चकाकी मिळाली ती कोहलीच्या एका कृतीनं. मैदानावर अकरा खेळाडू विजयासाठी धडपडत असतात. पण त्याच वेळी प्रेक्षकरूपी बाराव्या खेळाडूची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. संघाच्या विजयात त्याचाही तितकाच वाटा असतो. ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात हाच बारावा भिडू त्याची कामगिरी बजावत असताना कोहलीनं त्याची कानउघाडणी केली.


ओव्हल मैदानावर भारतीय चाहत्यांच्या उपस्थितीनं निळी झालरच पसरली होती. अधूनमधून ऑसीचे समर्थकाचे पिवळे ठिपके दिसत होते. पण भारताचे पाठीराखे विनाकारण स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना डिवचत होते. चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या या दोघांना सातत्यानं शेरेबाजीला सामोरं जावं लागत आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही सामन्यांत ते दिसले. पण कोणी न दाखवलेला समंजसपणा कोहलीनं दाखवला.


स्मिथला मुद्दाम चिडवणाऱ्या, अपमानजनक शेरेबाजी करणाऱ्या चाहत्यांना कोहलीनं धारेवर धरलं. फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक स्मिथचा चाहते अपमान करत होते, ते पाहून कोहली खवळला आणि त्यांनी इशाऱ्यानं चाहत्यांना जाब विचारला. खेळाडूंना प्रोत्साहन द्या, त्यांचा अपमान करू नका, असा धमकीवजा दमच त्यानं भरला. मग काय चाहते गप्प. दहा वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर कोहलीनं दाखवलेला हा मोठेपणा साहजिकच त्याला महान खेळाडूंच्या पंक्तीत नक्की नेऊन बसवेल. पण तूर्तात कोहलीच्या या पुढाकाराचे जगभरात कौतुक होत आहे. खरी खिलाडूवृत्ती काय असते, याचा आदर्श कोहलीनं युवा पिढीसमोर ठेवला आहे.

ICC World Cup 2019 : भारतीय चाहत्यांच्या चुकीसाठी कोहलीनं मागितली माफी, नेमकं काय घडलं?

ग्रेट विराट... स्मिथसाठी कॅप्टन कोहलीनं भारतीय चाहत्यांचेच कान टोचले

 

Web Title: ICC World Cup 2015: Virat Kohli's incredible gesture for Steve Smith during Ind vs Aus clash is winning hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.