Hyderabad ready to climb Kolkata | कोलकाताला झुंजवण्यास हैदराबाद सज्ज
कोलकाताला झुंजवण्यास हैदराबाद सज्ज

कोलकाता : दोन वेळेसच्या विजेत्या केकेआर संघासमोर शनिवारी आयपीएल लढतीत जबरदस्त फार्मात असणाऱ्या हैदराबाद सनरायजर्सचे कडवे आव्हान असणार आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकणारा सनरायजर्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
दुसरीकडे नाइटरायडर्स घरच्या मैदानावर २00 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जकडून झालेल्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करील. केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखालील सनरायजर्सचा संघ अनुभवी फलंदाजांची फळी आणि प्रभावी गोलंदाजांमुळे कागदावर सर्वात समतोल संघांपैकी एक गणला जात आहे; परंतु गुरुवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना हा संघ जास्त वेळ परिणामकारक दिसला नाही आणि त्यांना अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून विजय मिळवता आला. गोलंदाजांनी आपल्या प्रतिष्ठेनेरूप कामगिरी करताना मुंबईला ८ बाद १४७ धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले होते; परंतु पाठलाग करताना अनुभवी फलंदाज गमावले होते. दीपक हुडा आणि स्टॉनलेक या अखेरच्या जोडीने त्यांना विजय मिळवून दिला.
दुसरीकडे सनरायजर्सविरुद्ध लढतीत ८-४ अशी आघाडी घेणारा कोलकाताचा संघ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध याआधीच्या सामन्याप्रमाणेच कामगिरी करण्याचा प्रयत्न करील. त्यांनी याआधी आयपीएलमध्ये ईडन गार्डन्सवर पाहुण्या संघाला १७ धावांनी नमवले होते. मुंबईविरुद्ध सनरायजर्सच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे कोलकाता संघाच्या आशा उंचावल्या आहेत आणि या वेळेस ते आपल्या गोलंदाजांचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करतील.
आधीच्या लढतीत २0३ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरणाºया केकेआरला आपल्या गोलंदाजांकडून धारदार आणि भेदक गोलंदाजीची अपेक्षा असेल. त्यांच्यासाठी चांगली बाब म्हणजे वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून, तसे संकेतही गोलंदाजी प्रशिक्षक हिथ स्ट्रिक यांनी दिले आहेत. त्याचा भेदक मारा हैदराबादसाठी अडचणीचा ठरु शकतो. (वृत्तसंस्था)


Web Title: Hyderabad ready to climb Kolkata
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.