'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी?

राहुल द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. या उपाधीची जन्मकहाणी मोठी रंजक आहे आणि ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या द्रविडचं श्रेष्ठत्व त्यातून सहज जाणवतं.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 03:29 PM2018-02-08T15:29:21+5:302018-02-08T15:34:12+5:30

whatsapp join usJoin us
How and when did Rahul Dravid get the name as 'The Wall' | 'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी?

'महागुरू' राहुल द्रविडला कशी, कुणी, कधी दिली 'द वॉल' ही उपाधी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईः जॅमी ते महागुरू, हा 'जंटलमन' क्रिकेटवीर राहुल द्रविडचा प्रवास खरोखरच देदीप्यमान आहे. आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या द्रविडच्या नावाआधी जोडली गेलेली जगप्रसिद्ध उपाधी किंवा विशेषण म्हणजे 'द वॉल'. या उपाधीची जन्मकहाणी मोठी रंजक आहे आणि ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या द्रविडचं श्रेष्ठत्व त्यातून सहज जाणवतं.   

टीम इंडिया अंडर-१९ संघाच्या वर्ल्ड कप विजयात राहुल द्रविडचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. 'संयमाचा महामेरू, टीम इंडियाचा आधारू', अशा काव्यरचना सोशल मीडियावर शेअर होताहेत. त्याच्यावरच्या प्रत्येक बातमीत, लेखात 'द वॉल' हे विशेषण आहेच. स्वाभाविकच, राहुल द्रविड या नावाचा अविभाज्य भाग झालेली ही उपाधी त्याला नेमकी कशी मिळाली, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर, मिस्टर डिपेन्डेबलला अत्यंत अचूक असं विशेषण दिल्याबद्दल आपल्याला - तमाम द्रविडप्रेमींना दोन व्यक्तींचे आभार मानायला हवेत. त्या म्हणजे निमा नामचू आणि नितीन बेरी. विशेष म्हणजे, द्रविडच्या पहिल्या कसोटी मालिकेतच त्यांनी त्याला हे विशेषण दिलं होतं, ते आता अजरामरच झालं आहे. 

लिओ बर्नेट या अॅड एजन्सीकडे रिबॉक कंपनीनं जाहिरातीचं काम सोपवलं होतं. त्यात, संघातील प्रत्येक खेळाडूला, त्याच्या स्वभावाला - खेळाच्या शैलीला साजेसं असं नाव त्यांना द्यायचं होतं. राहुल द्रविड तेव्हा नवा भिडू होता. त्यामुळे त्याच्यासाठी विशेष नाम सुचवणं आव्हानात्मकच होतं. पण, पहिल्या कसोटी मालिकेतील द्रविडचा संयमी खेळ, त्याचं मैदानावरचं वावरणं, दबावापुढे न डगमगणं आणि चौकार-षटकारांच्या मागे न लागता खेळपट्टीवर टिच्चून उभं राहणं हे गुण हेरून निमा आणि नितीन यांच्या डोक्यात एक नाव पक्कं झालं आणि तेच होतं 'द वॉल'. आज दोन दशकांनंतरही ते द्रविडला तंतोतंत लागू होतं. याचं जेवढं श्रेय निमा - नितीन यांच्या दूरदृष्टीला आहे, तितकंच राहुल द्रविडच्या सातत्यालाही जातं. 

या अॅड कॅम्पेनमध्ये मोहम्मद अझरुद्दीनला The Assassin, अनिल कुंबळेला The Viper अशी विशेषणं दिली होती. ती आज कुणाच्याच लक्षात नाहीत. पण 'द वॉल' आजही भक्कम उभी आहे. 

Web Title: How and when did Rahul Dravid get the name as 'The Wall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.