राजकोट - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा आज 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे विराट कोहलीच्या 29 व्या वाढदिवसाच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलंय. पण पराभव विसरून 4 नोव्हेंबरला टीम न्यूझीलंडविरूद्धचा सामना झाल्यावर ठीक रात्री 12 वाजता टीमने ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडूनही विशेष आयोजन करण्यात आले होते.  
विराटने केक कापून झाल्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला. त्याने विराटच्या चेह-याला केक लावून अक्षरशः त्याला भूत बनवलं. 17 ऑक्टोबरला पांड्याचा वाढदिवस होता. तेव्हा पांड्याच्या चेह-यावर पूर्णपणे केक लावण्यात आला होता. त्यावेळी, वर्षात प्रत्येकाचा वाढदिवस येतो...बदला घेतला जाईल असं  पांड्या म्हणाला होता.विराटला केक लावून झाल्यानंतर त्याने कोहलीसोबतचा फोटो ट्विट केला आणि बदला नंबर 1...वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन कोहली असं ट्विट केलं.    शानदार फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने कालच्या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. टी-20मध्ये 7000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज तो बनला.