ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत'काही मत्सर लोकांची इच्छा आहे की, धोनीने खराब खेळावं ज्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपताना त्यांना पाहता यावं''भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचं महत्व माहित आहे, आणि आम्हाला धोनीवरील टिकेमुळे काही फरक पडत नाही'

कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत. 'पण काही मत्सर लोकांची इच्छा आहे की, धोनीने खराब खेळावं ज्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपताना त्यांना पाहता यावं', अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी टीकाकारांनी सुनावलं आहे. आनंदबाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी उघडपणे आपलं मत मांडत धोनीची पाठराखण केली आहे. 

रवी शास्त्री बोलले आहेत की, 'हे खूप मत्सर लोक आहेत, जे त्याचं करिअर संपण्याची वाट पाहत आहेत. पण महान खेळाडू आपलं भविष्य स्वत: ठरवत असतात'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचं महत्व माहित आहे, आणि आम्हाला धोनीवरील टिकेमुळे काही फरक पडत नाही'.

'धोनीवरील टिकेला आम्ही फार महत्व देत नाही. धोनी काय आहे हे आम्हाला माहित आहे. धोनी आपल्या संघासाठी एक समर्पित खेळाडू आहे. तो एक महान कर्णधार होता आणि आता एक टीम मॅन आहे', असं रवी शास्त्री यांनी सांगितलं. 

काही माजी खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. धोनीला टी-20 संघातून बाहेर केलं पाहिजे असं मत विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली आणि अजित आगरकरसारख्या खेळाडूंनी व्यक्त केलं आहे. यासंबंधी विचारलं असता रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'मी टेलीव्हिजन करायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. शो सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात. धोनी एक सुपरस्टार आहे आणि महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर नेहमी चर्चा केली जाऊ शकते. तो एक महान खेळाडू आहे म्हणूनच त्याच्याबद्दल बोललं जातंय. जेव्हा तुमचं करिअर इतकं शानदार असतं, तेव्हा तुम्हा एक चांगला विषय बनता.'

टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या धोनीबद्दल बोलताना रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'गेल्या एक वर्षात वन-डे इंटरनॅशनलमध्ये धोनीचा बॅटिंग अॅव्हरेज 65 हून अधिक आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात भारताला विजय मिळवून देण्यात धोनीने महत्वाची भूमिका निभावली होती'.

याआधी विराट कोहलीनेही धोनीची पाठराखण करत चांगलंच सुनावलं होतं. विराट कोहली बोलला होता की, 'पहिली गोष्ट म्हणजे तर लोकं धोनीवरच का टीका करतायेत हेच मला कळत नाही असं कोहली म्हणाला. मी जर का 3 सामन्यांमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरलो तर माझ्यावर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण मी 35 वर्षांचा नाहीये. मात्र त्याच्यासोबतच असं का? तो मुलगा(धोनी)  फिट आहे, प्रत्येक फिटनेस टेस्ट तो पास होतोय. शक्य असेल त्या सर्व पद्धतीने तो संघाची मदत करतो, त्याच्या बॅटिंगनेही आणि यष्टिरक्षणानेही. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याने चांगलं प्रदर्शन केलंय. या मालिकेत त्याला फलंदाजीसाठी जास्त वेळ मिळाला नाही. 'राजकोटच्या सामन्यातील पराभवाबद्दल धोनीला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. धोनी ज्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, तिथं येऊन धावा जमवणं सोप्पं नसतं. या मालिकेत हार्दिक पंड्यालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही. तरीही फक्त धोनीवर टीका होतेय. चार फलंदाज बाद झाले असताना आणि नव्या चेंडूवर गोलंदाजी सुरू असताना फलंदाजावर मोठा दबाव असतो, हे समजून घ्यायला हवं. राजकोटमध्ये जर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला असता तर तोही धावा करु शकला नसता. कारण तिथली परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे धोनीवर टीका करण्याचा अधिकार कुणाला नाहीये'.