ठळक मुद्देरवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बाजू घेत टीकाकारांना सुनावलं आहेफुकटचे सल्ले देणा-यांनी आधी आपल्या करिअरकडे पहावं असं रवी शास्त्री बोलले आहेत'धोनीमध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक असून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं संघाचं कर्तव्य आहे'

कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बाजू घेत टीकाकारांना सुनावलं आहे. दोन वेळा वर्ल्डकप जिंकवून देणा-या महेंद्रसिंग धोनीवर टीका करत फुकटचे सल्ले देणा-यांनी आधी आपल्या करिअरकडे पहावं असं रवी शास्त्री बोलले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्यासहित काही खेळाडूंनी धोनीच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. धोनीने टी-20 मधून निवृत्ती घ्यावी असा सल्लाही त्याला देण्यात आला. मात्र रवी शास्त्री यांनी महेद्रसिंग धोनीची बाजू भक्कमपणे मांडली आहे. 

'धोनीवर टीका करण्यासाठी लोकांनी आपल्या करिअरकडे पाहिलं पाहिजे. धोनीमध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक असून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं संघाचं कर्तव्य आहे', असं रवी शास्त्री बोलले आहेत. रवी शास्त्री फॅन्टस्टिक स्पोर्ट्स म्युझिअममध्ये गेले असता, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. 'धोनीपेक्षा सर्वोत्कृष्ट खेळाडू सध्या संघात नाहीये', असंही रवी शास्त्री बोलले आहेत. 

याआधीही रवी शास्त्री महेंद्रसिंग धोनीच्या समर्थनार्थ पुढे आले होते. महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करताना त्यांनी तोंडभरुन कौतुक केलं होतं. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले होते. 'पण काही मत्सर लोकांची इच्छा आहे की, धोनीने खराब खेळावं ज्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपताना त्यांना पाहता यावं', अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी टीकाकारांनी सुनावलं होतं. आनंदबाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी उघडपणे आपलं मत मांडत धोनीची पाठराखण केली होती. 

रवी शास्त्री बोलले होते की, 'हे खूप मत्सर लोक आहेत, जे त्याचं करिअर संपण्याची वाट पाहत आहेत. पण महान खेळाडू आपलं भविष्य स्वत: ठरवत असतात'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीचं महत्व माहित आहे, आणि आम्हाला धोनीवरील टिकेमुळे काही फरक पडत नाही'.

'धोनीवरील टिकेला आम्ही फार महत्व देत नाही. धोनी काय आहे हे आम्हाला माहित आहे. धोनी आपल्या संघासाठी एक समर्पित खेळाडू आहे. तो एक महान कर्णधार होता आणि आता एक टीम मॅन आहे', असं रवी शास्त्री यांनी सांगितलं होतं. 

काही माजी खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. धोनीला टी-20 संघातून बाहेर केलं पाहिजे असं मत विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली आणि अजित आगरकरसारख्या खेळाडूंनी व्यक्त केलं आहे. यासंबंधी विचारलं असता रवी शास्त्री यांनी सांगितलं होतं की, 'मी टेलीव्हिजन करायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. शो सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात. धोनी एक सुपरस्टार आहे आणि महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर नेहमी चर्चा केली जाऊ शकते. तो एक महान खेळाडू आहे म्हणूनच त्याच्याबद्दल बोललं जातंय. जेव्हा तुमचं करिअर इतकं शानदार असतं, तेव्हा तुम्हा एक चांगला विषय बनता.'