धुरक्यात हरवलेला खेळ आणि खिलाडूवृत्ती

भारत  आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय.

By Balkrishna.parab | Published: December 4, 2017 09:32 PM2017-12-04T21:32:24+5:302017-12-04T21:34:54+5:30

whatsapp join usJoin us
The game lost and lost in the dust | धुरक्यात हरवलेला खेळ आणि खिलाडूवृत्ती

धुरक्यात हरवलेला खेळ आणि खिलाडूवृत्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत  आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय. थंडीचा मौसम असल्याने दिल्लीच्या हवेत सध्या गरवा आहे आणि या गारव्याबरोबरच दिल्लीच्या हवेत ठाण मांडलेय ते दाट धुरक्याने. या धुरक्याची दाट चादर कोटलावर पसरल्याने तिसऱ्या कसोटीचा खेळ झाकोळला गेलाय.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली ऐन बहरात होता. मैदानावर ड्राइव्ह, कट, पुल, स्विप अशी फटक्यांची चौफेर बरसात सुरू होती. अशा वेळी श्रीलंकन खेळाडूंनी मैदानात आलेल्या धुरक्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली. पंचांनी खेळ थांबवण्यास नकार दिल्यावर तोंडावर मास्क लावून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्यास सुरुवात केली. मात्र प्रत्येक चेंडूनंतर पाहुण्या खेळाडूंकडून होणाऱ्या धुरक्याच्या कागाळ्यांमुळे भारतीय फलंदाजांची लय बिघडली. विराटचे संभाव्य त्रिशतक हुकले तर आपला डावही घोषित करावा लागला. मात्र या प्रकारानंतर श्रीलंकन खेळाडू रडारवर आलेत. त्यांच्या अखिलाडूवृत्तीवर टीका होतेय. प्रथमदर्शनी तरी श्रीलंकन खेळाडूंनी विराट कोहली आणि भारतीय संघाला रोखण्यासाठी धुरक्याचे निमित्त केल्याचे स्पष्ट दिसतेय. त्याचा त्यांना लाभही झाला. पण एवढ्यावरून श्रीलंकन खेळाडूंना दोषी मात्र ठरवता येणार नाही. कारण अडचणीत असल्यावर अंधुक प्रकाश, पाऊस यांचं निमित्त करून खेळ थांबवण्याचा प्रयत्न सगळेच खेळाडू करतात.
मात्र या सगळ्या प्रकारात मैदानावर जो काही गोंधळ झाला तो मात्र खेळाच्या लौकिकाला शोभणारा नव्हता. श्रीलंकन खेळाडूंना कदाचित धुरक्याचा त्रास झाला असेलही. मात्र तो निदर्शनास आणून देताना त्यांनी केलेला आताताईपणा नक्कीच खिलाडूवृत्तीला साजेसा नव्हता. त्यामुळेच सुसाट सुटलेल्या विराटला रोखण्यासाठीच श्रीलंकन संघाकडून हा रडीचा डाव खेळला गेल्याची चर्चा सुरू झालीय. पण या सर्वाला श्रीलंकन खेळाडूच जबाबदार आहेत का?
खरंतर वाढलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीतील धुरक्याची समस्या गंभीर झाली आहे. गेल्या महिन्यात तर धुरक्यामुळे दिल्लीकरांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. गेल्या वर्षी धुक्यामुळे दिल्लीतील काही रणजी सामने रद्द करावे लागले होते. तसेच काही सामन्यांमध्ये पूर्ण खेळ होऊ शकला नव्हता. अशी परिस्थिती असतानाही दिल्लीत कसोटी सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
धुरक्याचा सामन्यामध्ये अडथळा येऊ शकतो याची माहिती असूनही क्रिकेट मंडळाने सामन्याचे ठिकाण बदलले नाही. राष्ट्रीय हरित लवादानेही प्रदूषणाची पातळी वाढलेली असताना कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आल्याने संताप व्यक्त केलाय. प्रदूषणाची पातळी वाढण्याचे वृत्त आलेले असताना सामन्याचे आयोजन होता कामा नये होते, असे मत राष्ट्रीय हरित लवादाने व्यक्त केले आहे. मग अशी परिस्थिती असताना क्रिकेट सामन्याचे तेही पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा घाट घालणारे क्रिकेट मंडळही या दोषी नाही काय. 

Web Title: The game lost and lost in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.