Foremost in terms of team performance | सांघिक कामगिरीच्या जोरावर अग्र स्थानी
सांघिक कामगिरीच्या जोरावर अग्र स्थानी

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
सनरायझर्स हैदराबादचे तीन साखळी सामने शिल्लक असूनही संघाने प्ले-आॅफ लढतीत दिमाखात प्रवेश केला. हे संघाचे आणि खेळाडूंच्या यशाचे प्रतीक आहे. सुरुवातीलाच संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला आम्ही गमावले; पण हतबल न होता संघ आगेकूच करीत आहे. आतापर्यंतच्या परिणामांमुळे मी खुश असून या यशामागे फक्त ११ खेळाडूंची मेहनत नसून याचे श्रेय सनरायझर्सच्या संपूर्ण टीमला जाते. टी-२० हा उच्च दर्जाचा प्रकार असून आयपीएलमुळे याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा संघ सांघिक कामगिरीच्या जोरावर अग्रस्थानी पोहोचला आहे. संघाच्या यशात गोलंदाजीचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत आहेत. दबावाखालीसुद्धा आमची गोलंदाजी अधिक बहरत आहे. फलंदाजांनीही सर्वच सामन्यांत आपली छाप सोडली आहे. कालच्या सामन्यात ऋषभ पंतच्या झंझावातासमोर आमची गोलंदाजी दबावाखाली आली होती; पण दोघा अनुभवी फलंदाजांनी अखेरीस विजयश्री खेचून आणली आणि आम्ही सलग सहावा विजय साजरा करू शकलो. माझ्या मते, केन विल्यम्सन हा स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज असून तो सातत्याने धावा करीत आहे. त्याने आपल्या फलंदाजीबरोबर उत्कृष्ट नेतृत्वाचीही छाप संपूर्ण स्पर्धेत सोडली आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतील तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. शिखर धवनचीसुद्धा धावांची भूक कमी झालेली दिसत नाही. दोघेही फलंदाज नेटमध्ये जास्तीत जास्त चेंडूंचा सामना करीत असतात. याचा फायदा त्यांना दिल्लीने उभारलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झाला. सध्याच्या घडीला संघावर कोणताही दबाव नसला तरी प्ले-आॅफमध्येसुद्धा प्रथम क्रमांक कायम राखण्याचाच आमचा मानस आहे.
स्पर्धेच्या मध्यावर उत्कंठा दिवसागणिक वाढत चालली आहे. जलद क्रिकेटचा हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय होताना दिसून येत आहे. यामध्ये विक्रमांचा तर पाऊस पडतो आहे. के. एल राहुल, ऋषभ पंत, जोस बटलरसारखे नवे हिरो आजच्या घडीला नावारूपाला आलेले दिसून येतात. माझा विश्वास आहे, की जशी या स्पर्धेची सुरुवात धडाक्यात झाली. शेवटही त्यापेक्षाही अधिक धडाक्यात होणार आहे.


Web Title: Foremost in terms of team performance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.