आयरिश कर्णधारामुळे इंग्लंड झाले ‘विश्वविजेते’

जन्माने आयरिश असलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनने इंग्लंडला प्रथमच विश्वविजयी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:57 AM2019-07-16T03:57:05+5:302019-07-16T03:57:45+5:30

whatsapp join usJoin us
England wins 'World Winner' | आयरिश कर्णधारामुळे इंग्लंड झाले ‘विश्वविजेते’

आयरिश कर्णधारामुळे इंग्लंड झाले ‘विश्वविजेते’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- आकाश नेवे
जन्माने आयरिश असलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनने इंग्लंडला प्रथमच विश्वविजयी केले. स्वभावाने ‘कूल’ पण आक्रमक फलंदाज असलेल्या मॉर्गनने क्रिकेटचे धडे आयर्लंडमध्ये गिरवले. त्याच्या कुटुंबातच क्रिकेट होतं. पण मॉर्गन त्या सर्वांपेक्षा पुढे होता.
इयॉन मॉर्गनने युरोपियन चॅम्पियनशीप डिव्हिजन वनमध्ये आयर्लंडकडून स्कॉटलंडविरुद्ध पर्दापण केले होते. त्याने त्या सामन्यात ९९ धावा केल्या. तो धावबाद झाला होता अन्यथा शंभरी गाठून विक्रम केला असता.
तो एकाच वेळी काऊंटीत मिडलसेक्स व आयर्लंडच्या राष्ट्रीय संघाकडूनही खेळत होता. २००७ च्या विश्वचषकात मॉर्गन आयर्लंडकडूनच खेळला होता. त्या स्पर्धेत त्याला फक्त ९१ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्याने आपल्या एकट्याच्या जोरावर आयर्लंडला २०११ च्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवून दिली. मात्र विश्वचषक खेळण्याआधीच त्याने आपल्या उज्ज्वल भविष्याचा विचार करत आयर्लंड सोडले आणि इंग्लंड गाठले.
मुळात रिपब्लिक आॅफ आयर्लंड हे ग्रेट ब्रिटन मधून स्वतंत्र झाले आहे. त्यामुळे सख्ख्या शेजारी देशाकडून खेळणार म्हणून त्याच्यावर टीकाही झाली. पण तरीही तो २०११ च्या विश्वचषकात इंग्लंडकडून खेळला. २०१५ च्या विश्वचषकातही तो इंग्लंडचा कर्णधार होता, पण दुर्दैवाने संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. तरीही ईसीबीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे कर्णधारपद कायम राहिले. यानंतर त्याने २०१९ च्या विश्वचषकात मायदेशातच इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे
योगदान दिले.
बेन स्टोक्स : न्यूझीलंडच्या रग्बीपटूचा मुलगा ते इंग्लंडच्या विश्व विजयाचा नायक
इंग्लंडच्या विश्व विजेतेपदाचा नायक बेन स्टोक्स हा मुळचा न्यूझीलंडचा असून त्याचा जन्म ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता. मात्र आपल्या कर्मभूमीकडून खेळताना त्याने मायभूमीलाच पराभूत केले.
बेंजामीन अँड्रयू स्टोक्सचे वडील गेरार्ड स्टोक्स हे न्यूझीलंडच्या रग्बी संघाकडून खेळले आहेत. बेन १२ वर्षांचा असताना त्यांची इंग्लंडच्या एका क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि संपूर्ण परिवार इंग्लंडला स्थायिक झाले. २०१३ पर्यंत इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर गेरार्ड व इतर कुटूंबिय न्युझीलंडला परतले आणि पुन्हा ख्राईस्टचर्चमध्ये रहायला लागले. मात्र बेन इंग्लंडमध्येच राहिला आणि नंतर त्याची इंग्लंडच्या क्रिकेट संघात वर्णी लागली.

Web Title: England wins 'World Winner'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.