ऑगस्टा - आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात संघाच्या एकूण धावांच्या तुलनेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा माजी खेळाडू विवियन रिचर्ड्स यांच्या नावावर आहे. त्यांनी संघाच्या धावांपैकी 69.48 % धावा 1984 साली केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलिया येथील वेस्ट ऑगस्टा संघातील जोश डस्टन या खेळाडूने एकाच सामन्यात तब्बल 40 षटकार मारायची कामगिरी केली आहे. 

35 षटकांच्या या सामन्यात सेंट्रल स्टर्लिंग संघाविरुद्ध खेळताना त्याने तब्बल 307 धावांची झंझावाती खेळी केली. वेस्ट ऑगस्टा संघाने संपूर्ण सामन्यात 354 धावा केल्या तर त्यातील जोश डस्टनने एकट्याने तब्बल 87 % अर्थात 307 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकरही मारले हे विशेष. यावेळी स्कोरबोर्डवर त्याने किती चेंडूत हे त्रिशतक केले हे लिहिले नव्हते. परंतु सामनाच 35 षटकांचा असल्यामुळे त्याच्या जबदस्त स्ट्राइक रेटचा अंदाज येतो. एकाच सामन्यात 40 षटकार खेचत त्यानं जगभरातील क्रिकेटप्रेमींच लक्ष वेधलय. 


जोश डस्टनचे अन्य सहकारी एकही धाव न करता माघारी परतले. त्यानंतर संघातील दुसऱ्या खेळाडूच्या सर्वाधिक धावा 18 अशा होत्या. जोश डस्टनने सातव्या विकेटसाठी तब्बल 203 धावांची भागीदारी केली. त्यात त्याचा जोडीदार बेन रुसेलने केवळ 5 धावांचं योगदान दिले होते.