गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक : भारतीय संघाचा१८ धावांनी झाला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:31 AM2019-07-11T05:31:29+5:302019-07-11T05:32:06+5:30

whatsapp join usJoin us
Bowlers have earned, batsmen have lost | गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर : गोलंदाजांनी अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर संघाला आणून ठेवले, मात्र फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे टीम इंडियाला हा उंबरठा ओलांडता आला नाही, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा करुन भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि नंतर अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या ११६ धावांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाचा १८ धावांनी पराभव झाला.


किवींनी दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ४९.३ षटकात २२१ धावांत संपुष्टात आला. आघाडीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याने भारताची ९२ धावा ६ बळी अशी बिकट अवस्था झाली होती. परंतु, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी वेगळाच निर्धार करुन खेळी केली. संथपणे खेळत असल्याचा ठपका लावून याआधी अनेक माजी क्रिकेटपटूंनी, चाहत्यांनी व क्रिकेटतज्ज्ञांनी धोनीवर टीकेची झोड उठवली होती. मात्र त्यानेच जडेजाला अधिकाधिक स्ट्राइक देत भारताचा डाव सावरण्यात मोलाचे योगदान दिले. दोघांनी भारताच्या विजयाच्या धुसर आशा ‘स्पष्ट’ केल्या होत्या. परंतु, ४८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर टेÑंट बोल्टने जडेजाचा बहुमूल्य बळी मिळवत किवींच्या विजयातील मोठा अडसर दूर केला. जडेजाने ५९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या. यानंतर भारताच्या आशा धोनीवर होत्या. त्याने एक षटकार ठोकून न्यूझीलंडवर दबावही आणले. मात्र, ४९व्या षटकात अतिरिक्त धाव घेताना तो धावबाद झाला व भारताची मोहीमही संपुष्टात आली. धोनीने ७२ चेंडूत १ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या.


ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस रंगलेल्या या ‘एकदिवसीय’ सामन्यात मंगळवारी किवींनी ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा काढल्या होत्या. यानंतर बुधवारी केवळ २८ धावांचीच भर टाकता आल्याने त्यांचा डाव ५० षटकात ८ बाद २३९ धावांवर रोखला गेला. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेल्या रॉस टेलरने ९० चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ७४ धावांची चिवट खेळी केली. भुवनेश्वर कुमारने ४३ धावांत ३ बळी घेतले.


भारताची ‘तगडी’ आणि फॉर्ममध्ये असलेली फलंदाजी पाहता हे आव्हान फारसे कठीण नव्हते. मात्र संथ खेळपट्टीवर किवींचा स्विंग मारा खेळण्याचा अंदाज चुकल्याने भारताची अवस्था ३ बाद ५ धावा अशी केविलवाणी झाली होती. स्पर्धेत खोºयाने धावा काढणारा रोहित शर्मा, मागच्या सामन्यातील शतकवीर लोकेश राहुल व रनमशीन म्हणून बिरुद मिरवणारा कर्णधार विराट कोहली हे प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले. येथेच भारताच्या पराभवाची चाहुल लागली. मॅट हेन्रीने राहुल, रोहित व दिनेश कार्तिक या प्रमुख फलंदाजांना बाद करत भारताला जबर हादरे दिले. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.


ज्याच्याकडे ‘दांडगा’ अनुभव असल्याचे पाहिले जात होते, त्या दिनेश कार्तिकनेही (६) निराशा केली. युवा रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी ४७ धावांची भागीदारी करुन संघाचा केवळ डाव सावरलाच नाही, तर भारताच्या विजयाच्या आशाही उंचावल्या. मात्र दोघेही चांगले स्थिरावलेले असताना खराब फटका मारुन परतले. पंतने ५६ चेंडूत ४ चौकारांसह ३२, तर पांड्याने ६२ चेंडूत २ चौकारांसह ३२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, तर टेÑंट बोल्ट व मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. दडपणाखाली भारताला आवश्यक धावगती राखता आली नाही.


जडेजाची खेळी विशेषच!
लाजिरवाणी हार ते संघर्षमय पराभव असा झुंजार खेळ रविंद्र जडेजाचा राहिला. त्याची खेळी विशेषच, कारण आठव्या क्रमांकावर त्याच्याहून अधिक धावांची खेळी करणारे फक्त १३ फलंदाज आहेत. विश्वचषक स्पर्धेत आठव्या क्रमांकावर जडेजाहून अधिक धावा केवळ आॅसीच्या नॅथन कुल्टर-नाईलच्या नावावर आहे. त्याने यंदाच्याच स्पर्धेत विंडीजविरुध्द ६० चेंडूत ९२ धावा केल्या होत्या.
खलिस्तान समर्थकांना रोखले
या सामन्यावेळी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाºया शिख कार्यकर्त्यांना मैदानाबाहेर काढण्यात आले. पोलीसांनी सांगितले की, ‘ दोन पुरुषांना शांतता भंग केल्याप्रकरणी अटक करुन नंतर सोडण्यात आले.’


पांड्याचा बळी : धोनीच्या जागी हार्दिक पांड्याला वरच्या स्थानी पाठविण्यात आले. पांड्याने खेळ सावरला खरा; पण ज्या स्थितीत त्याची गरज होती त्याचवेळी तो बाद झाला. त्याचा बळी निर्णायक ठरला. ३१ व्या षटकांत सँटनेरचे चार चेंडू पांड्या चाचपडत खेळला. मात्र, संयम तुटल्याप्रमाणे पाचव्या चेंडूवर बेभरवशी फटका मारत तो झेलबाद झाला. किवीची ही रणनीती यशस्वी ठरली.
बोल्टचे षटक : भारताच्या आशा जिवंत होत्या त्या धोनी आणि रवींद्र जडेजा या जोडीमुळे. मात्र, बोल्टच्या ४८ व्या षटकांत भारताचा घात झाला. ४८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जडेजाने उत्तुंग फटका मारला, मात्र तो फसला. किवी कर्णधार विलियम्सनने तो सहज टिपला.

गुप्टिलचा थ्रो : जडेजा बाद झाल्यानंतर भारत विजयापासून खूप दूर गेला. मात्र, धोनीकडून शेवटच्या आशा होत्या. दुसºया बाजूने भुवनेश्वर असल्याने धोनीनेच सर्व चेंडू खेळण्याची योजना बनविली. ४९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत धोनीने मन जिंकले खरे; पण तिसºया चेंडूवर दोन धावा घेण्याचा नादात तो धावबाद झाला. गुप्टिलच्या जबरदस्त ‘थ्रो’मुळे भारत विश्वचषकातून बाहेर पडला.

चौथ्यांदा भारतीय संघाचा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव.
न्यूझीलंडने विश्वचषकात सर्वाधिक सहा उपांत्य सामने गमावले आहेत.
सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यात न्यूझीलंडला यश.
सलग दुसºया विश्वचषकात भारताचे उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात.
मँचेस्टर येथे पहिल्यांदाच न्यूझीलंडने विश्वचषकाची उपांत्य लढत जिंकली. याआधी त्यांचा इंग्लंडविरुद्ध (१९७९) आणि पाकविरुद्ध (१९९९) येथे पराभव झाला होता.
५ सप्टेंबर २०१४ नंतर पहिल्यांदाज रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले. हे त्याचे अकरावे एकदिवसीय अर्धशतक ठरले.
विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात दोनवेळा धावबाद होणारा महेंद्रसिंग धोनी एकमेव फलंदाज.

Web Title: Bowlers have earned, batsmen have lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.